प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेचे दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आर्थुर डिसिल्वा यांनी मंगळवारी प्रभाग 7 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डिसिल्वा यांनी मागील विधानसभा निवडणूक कुडतरी मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढविली होती. मडगाव पालिकेचे ते मागील सलग 10 वर्षे नगरसेवक राहिले आहेत. आपली पहिली पालिका निवडणूक 2010 मध्ये प्रभाग 7 मधून लढवून ते नगरसेवक बनले होते. या पाच वर्षांच्या कार्यकाळात ते दोन वेळा नगराध्यक्ष बनले होते.
2015 मध्ये प्रभाग 7 अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यावेळी मडगाव मतदारसंघातील प्रभाग 22 मधून निवडणूक लढवून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा प्रभाग 7 मधून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीपासून काम सुरू केले होते. मात्र सदर प्रभाग अनुसूचित जमातींतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने त्यांनी प्रभाग 5 मधून उमेदवारी दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालय?ाच्या निवाडय़ानंतर झालेल्या आरक्षणात प्रभाग 5 महिलांसाठी राखीव झाला आहे, तर प्रभाग 7 खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपण प्रभाग 7 मधून उमेदवारी दाखल केल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले.
प्रभाग 7 मधील मतदारांनी आपण येथून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केल्याने त्यांच्या पाठिंब्यांच्या जोरावर आपण उमेदवारी दाखल केली असून मंगळवारी सकाळी श्री दामोदर देवस्थानाला भेट देऊन दामबाबाचा आशीर्वाद आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.