दिल्लीवारीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट
प्रतिनिधी /मडगाव
राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुमाकूळ सुरू असून अळंब्यांप्रमाणे राष्ट्रीय व स्थानिक पक्ष तयार होऊन निवडणुकीत नशीब आजम?वण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत तिकिटासाठी इच्छुकांची यादी वाढत चालली असून माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी मडगावातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी चालविल्याचे त्यांचे समर्थक सांगताना आढळत आहेत.
डिसिल्वा हे दोन वेळा मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कुडतरी मतदारसंघांतून भाजप तिकिटावर 5 हजारांहून जास्त मते मिळवून ते दुसऱया स्थानावर राहिले होते. मात्र यंदा त्यांनी मडगाव मतदारसंघावर डोळा ठेवला असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसिल्वा यांनी नुकतीच दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ट नेत्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच त्यांनी केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्यासोबत चर्चा करणारे छायाचित्र आपल्या समर्थकांना पाठविले असून डिसिल्वा दिल्लीत तिकिटासाठी वजन वापरत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
यासंदर्भात डिसिल्वा यांची प्रतिक्रिया जाणली असता असता आपण दिल्लीवारी केल्याचे त्यांनी मान्य केले. नगराध्यक्ष असताना आपण मडगाव मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीत आपण ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यासाठी तेव्हा काम केले होते व मडगावातून आघाडी मिळवून दिली होती, असा दावा त्यांनी केला.
आपणास नगराध्यक्ष बनवण्यासाठी मतदान केलेले मडगावातील काही नगरसेवक तसेच समर्थक आपण मडगाव मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी गळ घालत असल्याचे डिसिल्वा यांनी नजरेस आणून दिले. आपण भाजप तिकिटासाठी प्रयत्न करत आहात काय अशी विचारणा केली असता, आताच यासंदर्भात प्रतिक्रिया देणे योग्य होणार नसून तिकीट मिळाले, तर मडगावात कमळ फुलविण्यासाठी निश्चितच आपण सक्षम उमेदवार आहे, असे त्यांनी सांगितले.