तुर्कस्तानला फ्रान्सचे चोख प्रत्युत्तर : पाकिस्तानी दहशतवादी पोहोचले : संघर्ष चिघळला
वृत्तसंस्था / येरेवान, बाकू
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात नागोर्नो-काराबाख भूभागावरून भीषण युद्ध सुरू आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या संघर्षात 100 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. अलिकडच्या दिवसांमधील हे सर्वात भीषण युद्ध ठरले आहे. याचदरम्यान अजरबैजानच्या समर्थनार्थ तुर्कस्तानकडून पोहोचलेले सीरियन दहशतवाद्यांनीही युद्धात उडी घेतली आहे. तर तुर्कस्तानच्या धमकीनंतर आता फ्रान्सने आर्मेनियाला समर्थन दर्शविले आहे.
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील वाढता तणाव पाहता रशियाने लढाई संपुष्टात आणण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांनी दोन्ही देशांच्या सरकारसमोर हा प्रस्ताव मांडला आहे. तर लढाई संपविण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे.
रशियाची आर्मेनियासोबत सैन्य भागीदारी असली तरीही त्याचे अजरबैजानसोबत घनिष्ठ संबंध आहेत. आर्मेनियन सुरक्षा दलांनी संबंधित भाग सोडेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार अजरबैजानच्या राष्ट्रपतींनी बुधवारी केला आहे.
नागोर्नो-काराबाख येथील आर्मेनियाची एस-300 क्षेपणास्त्र यंत्रणा नष्ट केल्याचा दावा अजरबैजानच्या सैन्याने केला आहे. सुमारे 2,700 सैनिक आतापर्यंत या युद्धात जखमी झाले आहेत किंवा मारले गेले आहेत असा दावाही अजरबैजानकडून करण्यात आला आहे. तर अजरबैजान नागरिकांवर बॉम्बवर्षाव करत असल्याचा दावा आर्मेनियाने केला आहे.
तुर्कस्तानची अजरबैजानला मदत
आपले सुखोई-25 लढाऊ विमान तुर्कस्तानच्या एफ-16 ने पाडविल्याचा दावा आर्मेनियाच्या सरकारने केला होता. तुर्कस्तान आणि अजरबैजान या दोघांनीही हा दावा फेटाळला होता. परंतु आर्मेनियाने आता स्वतःच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे छायाचित्र प्रसारित केले आहे. अजरबैजान तुर्कस्तानच्या एफ-16 आणि ड्रोनचा वापर करून हल्ले करत असल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे.
दहशतवाद्यांचा सहभाग
अजरबैजानकडून युद्धात आता सीरियातील तुर्कसमर्थक क्रूर दहशतवादीही पोहोचले आहेत. यात अनेक पाकिस्तानी दहशतवादी सामील असल्याचे सांगण्यात येते. उत्तर सीरियात मागील आठवडय़ात दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या अनेकांना तुर्कस्तानमार्गे अजरबैजान येथे पाठविण्यात आले आहे. हे सर्वजण आर्मेनियाच्या विरोधात लढणार आहेत. तर तुर्कस्तानने यासंबंधीचे वृत्त नाकारले आहे.
तुर्कस्तानची धमकी
आर्मेनिया-अजरबैजान यांच्यातील युद्धामुळे नाटोचे दोन सहकारी देश फ्रान्स आणि तुर्कस्तानमधील वाद चिघळला आहे. फ्रान्समध्ये आर्मेनियन वंशाचे लोक मोठय़ा संख्येत राहतात. तुर्कस्तान या युद्धात उघडपणे अजरबैजानला समर्थन देत असून आर्मेनियाला धमकावत आहे. फ्रान्स आर्मेनियाच्या कब्जाला स्वतःचे समर्थन देत असल्याचा आरोप तुर्कस्तानचे विदेश मंत्री मेवलुट कावुसोग्लू यांनी केला आहे. यावर फ्रान्सच्या अध्यक्षांनी तुर्कस्तानला चांगलेच सुनावले आहे. तुर्कस्तान युद्धासारखी धमकी देत असून फ्रान्स ते सहन करणार नसल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.