ऑनलाईन टीम / येरेआन :
रशियाच्या मध्यस्थीनंतरही आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्ध शमन्याची चिन्हे दिसत नसल्याने आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांच्या पत्नी ॲना युद्धमैदानात उतरल्या आहेत.
42 वर्षीय ॲना यांनी महिला आघाडीत सैन्य प्रशिक्षण घेण्याचे ठरवले आहे. 27 ऑक्टोबरपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून, त्यांच्यासोबत 13 महिला प्रशिक्षण घेत आहेत. या महिलांना रायफलसह अन्य शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ॲना यांच्या प्रशिक्षणामुळे सैन्याचे मनोबल वाढले आहे.
आर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही देशात नागोर्नो-काराबाख या विभाजनवादी भूभागावरून 27 सप्टेंबरपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशातील 5 हजारहून अधिक जण मारले गेले आहेत. अखेर हे युद्ध थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी केली होती. चर्चेनंतर दोन्ही देशांनी तीन वेळा युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, युद्धबंदीच्या घोषणेनंतरही दोन्ही देशांची लढाई सुरूच आहे.