क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण : अन्य दोघांनाही जामीन,आर्यन आज बाहेर येण्याची शक्यता
प्रतिनिधी /मुंबई
आर्यन खानला 25 दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यासह मुनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही न्यायालयाने जामीन दिला आहे. तथापि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच या तिघांची तुरुंगाबाहेर सुटका होणार आहे. शुक्रवारी अथवा शनिवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिघेही तुरुंगाबाहेर येथील असे आर्यनचे वकिल माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी व ऍड. मानेशिंदे यांनी सांगितले. तर त्याना मिळालेल्या जामीनाबाबतच्या अटी आणि शर्ती उद्या शुक्रवारी स्पष्ट केल्या जातील, असेही न्यायालयाने म्हटल्याचे रोहतगी यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी हा निर्णय दिला आहे. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केल्यानंतर सुनावणी पूर्ण व न्यायालयाने निर्णय सुनावला. याआधी बुधवारी आर्यनच्यावतीने ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी व सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तथापि निकालाची प्रत शुक्रवारी येणार असल्याने आजची रात्र आर्यनला तुरुंगातच काढावी लागणार असून शुक्रवारी तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
शाहरुखने तीनवेळा वकिल बदलले
गेल्या 25 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीनासाठी शाहरुखने आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूखचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढे वाढलच नसते असेही वकिलांनी कोर्टाला सांगितले. आर्यनला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा केला होता.
एनसीबीचा युक्तीवाद
आर्यन ड्रग्जचे नियमित सेवन करत होता, हे सिद्ध करणारे आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱयाला ड्रग्ज असल्याची माहिती आहे, त्याने ड्रग्ज घेतले असतील तर पहिल्या व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो.
सुटका मात्र आज-उद्या
ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला तब्बल 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तथापि त्याला गुरुवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सायंकाळी उशीरा निर्णय दिल्याने निकालाची प्रत तुरुंग प्रशासनाला प्राप्त होऊ शकली नाही. या आदेशाची प्रत आणि ऑपरेटीव्ह पार्ट उद्या शुक्रवारी तुरुंग प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यनची सुटका होणार आहे. जर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला तर ही सुटका आणखी एक दिवस म्हणजे शनिवारपर्यंत लांबणीवर पडू शकते, असे आर्यनचे वकिल मुकुल रोहतगी यांनी सांगितले.