मुंबई/प्रतिनिधी
कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी आणि प्रभाकर साईल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रभाकर साईलने आर्यन खानला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी २५ कोटींची डील केल्याचा आरोप केला होता. यांनतर आता क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलेल्या सॅम डिसोझा यांनी मोठा दावा केला आहे. आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त न केल्याचा दावा केला आहे. किरण गोसावी यांना पैशांचा व्यवहार करायचा होता असेही सॅमने सांगितले. तसेच गोसावीने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह केला होता. तर सुनील नावाच्या व्यक्तीला गोसावी यांच्याकडून सूचना मिळत असल्याचा दावाही सॅम डिसोझा यांनी केलाय. याआधी सॅम डिसोझा यांच्यावर अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील छापा प्रकरणातील पंच साक्षीदार केपी गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप केला होता.
आर्यन खानला यातून बाहेर काढण्यासाठी गोसावीने ५० लाख रुपये घेतले होते पण मी त्याला पैसे परत करायला लावले असा दावा डिसोझा यांनी केला आहे. दरम्यान, डिसोझा यांनी सोमवारी एबीपी माझासोबत बोलताना हे खुलासे केले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची या कथित डीलमध्ये कोणतीही भूमिका नव्हती आणि गोसावी यांनी केवळ त्यांच्या संपर्कात असल्याचे नाटक केले होते. किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असल्याचे लक्षात आल्यानंतर डिसोझा यांनी दावा केला की त्यांनी गोसावीला पैसे परत केले.
गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या आणि या कथित ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने गेल्या महिन्यात डिसोझा यांच्याशी फोनवर बोलताना गोसावींना बोलताना ऐकल्याचा आरोप केल्यावर डिसोझा यांचे नाव पुढे आले होते. ज्यामध्ये दादलानीला २५ कोटी रुपये मागण्यात आले होते आणि त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असे साईलने म्हटले होते.