युवा वर्गाला दिला व्यायामाचा संदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
सरनाईक वसाहत येथील आदर्श प्रशालेची विद्यार्थिनी आर्या पाटील हिला फिनिक्स राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला. सांगली महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील व न्यायाधीश मुकुंद दाते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्या पाटील हिने वयाच्या पाचव्या वर्षी सुरू केलेल्या स्केटींग खेळाने जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या खिलाडूवृतीची चमक दाखविली. त्याचबरोबर पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत, तसेच वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, घोषवाक्य, लाठीकाठी आदी स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले. तिच्या या अष्टपैलु व्यक्तीमत्वामुळे तिला सांगली येथील फिनिक्स स्पोर्ट्स अँड कल्चर फाउंडेशन मार्फत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी आर्या म्हणाली की, तरूणपणात शरीराचे लाड करू नका, मोबाईल किंवा अन्य साधनांपेक्षा प्रत्यक्ष मैदानावर व्यायाम करा. आपले ध्येय संपादन करण्यासाठी प्रचंड कष्ट, चिकाटी, जिद्द आपल्या अंगी असली पाहिजे. उत्तम आरोगय हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. जीवनात यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहा असा संदेश आर्या हिने युवा वर्गला दिला. आदर्श प्रशालेचे संस्थाध्यक्ष रावसाहेब पाटील, सचिव आर. के. पाटील, मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, वर्गशिक्षक डी. पी. सुतार, प्रशिक्षक अजित शिलेदार, जयराम जाधव, वडील अरूण पाटील, आई प्रा. सुषमा पाटील, अमोल साठे, राकेश प्रधान, सुरज मसवेकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.