वार्ताहर/ कराड
शनिवारी सकाळी कराडच्या वाखाण परिसरातील एका 35 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारीच रात्री दहा वाजता कराड-पुसेसावळी रोडवर वाघेरी फाटय़ानजीक आर्वी येथील 40 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत नवनाथ रामचंद्र पवार यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने कराड तालुका हादरला आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पवार हा फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. गावातीलच दीपक शरद इंगळे याला रमेशचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा 10 ते 15 दिवसांपासून संशय आला होता. त्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी रमेश व दीपक यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास रमेश पवार हा गावातीलच लखन बालेखान मुलाणी याच्या बोलेरो पिकअपमधून भाजीपाला आणण्यासाठी कराडला गेला होता. त्यावेळी रमेश व लखनसह अमर पोपट नेटके व दत्तात्रय पवार गाडीत होते. कराड येथून भाजीपाला खरेदी करून चौघेजण रात्री दहाच्या सुमारास पुन्हा बोलेरो पिकअपने आर्वीकडे निघाले असताना कराड-पुसेसावळी रस्त्यावर वाघेरी फाटय़ापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून येणाऱया तवेरा गाडीने पिकअपला ओव्हरटेक केले व बोलेरोच्या आडवी तवेरा लावली. यावेळी रमेश क्लिनर बाजूला बसला होता.
तवेरा गाडीतून गावातील दीपक शरद इंगळे, संदीप सुभाष इंगळे व दोन अनोळखी इसम उतरले. संदीपच्या हातात पिशवी होती. दीपक व संदीप दोघेजण रमेशला गाडीतून खाली ओढत होते. पण रमेश हा ‘आपण काही असेल ते गावात जाऊन बघू’ असे म्हणत होता. यावेळी अचानक संदीपने त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतील मिरचीपूड काढून रमेशच्या डोळ्यात फेकली. यावेळी रमेश ‘चटणी फेकली, चटणी फेकली’ म्हणून जोराने ओरडू लागला. नंतर दीपकने पळत जाऊन तवेरा गाडीतून तलवारीसारखे धारदार शस्त्र घेऊन आला व रमेशला गाडीतून बाहेर ओढून वार करू लागला. यावेळी उपस्थित दोन अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने रमेशला मारहाण केली. रमेशला मारहाण सुरू असतानाच संदीपने बोलेरोतील तिघांकडे बघत ‘हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तुम्ही येथून निघून जावा. नाही तर तुमच्याकडे पण बघून घेऊ’, अशी धमकी दिली. त्यामुळे रमेशच्या बरोबर असलेले तिघेजण पुढे असलेल्या धाब्यावर गेले व तेथे असणाऱया लोकांना रमेशला काही लोक मारहाण करीत असल्याचे सांगितले. यानंतर धाब्यावरील लोकांना घेऊन हे तिघेजण परत घटनास्थळी आले असता रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. रमेशला पिकअपमधून कराड येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रमेश मयत असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, मानतेश कोळी, प्रशांत तारळकर आदी उपस्थित होते. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत.