आजपासून उलट तपासणी सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
बिहार व आंध्रप्रदेशमधील सराईत गुन्हेगारांचा वापर करून बन्नंजे राजाने आर. एन. नायक यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारापूर्वी त्यांना धमकीही दिली होती. या खटल्याची सुनावणी येथील कोका न्यायालयात सुरू आहे. त्याठिकाणी गुरुवारी पोलीस अधिकारी शरणगौडा यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारपासून उलट तपासणीला प्रारंभ होणार आहे.
खंडणीसाठी बन्नंजे राजा याने आर. एन. नायक यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र त्याला विरोध केल्याने आपल्या हस्तकांकरवी नायक यांचा खून केला होता. त्यानंतर बन्नंजे राजासह इतर आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी काही गुन्हेगारांना अटक केली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार बन्नंजे राजा उर्फ राजेंद्रकुमार (वय 48) याला कर्नाटक पोलिसांनी 6 ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील मोरोक्को येथे ताब्यात घेतले होते. त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
या खटल्याचे कामकाज आता जलदगतीने होत आहे. अनेकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 200 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असून या खटल्याचा निकाल लवकरच लागणार आहे. या खटल्यामध्ये ऍड. बी. जे. गंगाई, ऍड. प्रवीण करोशी यांच्यासह इतर वकील काम पाहत आहेत.