पाचगाव / वार्ताहर
कोल्हापूर शहरातील आर. के. नगर-मोरेवाडी मुख्य रस्त्यावर शॉर्टसर्किटमुळे एका चालत्या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये ड्रायव्हरला कोणतीही इजा झाली नाही. आर. के. नगर केएमटी कॉलनी येथील विकास भुरभुसे यांच्या मालकीची चारचाकी गाडी (MH09 AB 8838) मध्ये त्यांचा मित्र पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोरेवाडीच्या दिशेने मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान घेऊन चालला होता. गाडीमध्ये फक्त चालक होता. यावेळी शॉर्टसर्किटमुळे गाडीच्या इंजिन मधून धूर यायला लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराने ही बाब गाडी चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.
गाडीचा चालक वेळीच गाडीमधून बाहेर उतरला. मात्र क्षणात गाडीच्या इंजिनने पेट घेतला व रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाची गाडी येऊन आग विझवे पर्यंत गाडीचे प्रचंड नुकसान झाले. विकास भुरभुसे यांनी सांगितले की, गाडीही सुस्थितीत होती मात्र अचानक शॉर्टसर्किटमुळे गाडीच्या इंजिनने पेट घेतला, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.