एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेची आठवी फेरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक अव्वलमानांकित, जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर मात करत अवघ्या बुद्धिबळ वर्तुळाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. क्विन्स गॅम्बिट डिक्लाईननंतर तॅरॅश व्हेरिएशनमध्ये रुपांतरित झालेल्या या डावात प्रज्ञानंदने 39 व्या चालीत विजय संपादन केला. प्रज्ञानंद या आठव्या फेरीत काळय़ा मोहऱयांनी खेळत होता.
या निकालामुळे विद्यमान जगज्जेत्या कार्लसनची सलग तीन विजयांची परंपरा देखील खंडित झाली. भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद 8 फेऱयांअखेर 8 गुणांसह संयुक्त 12 व्या स्थानी असून या स्पर्धेतील पहिल्या 7 फेऱयांमध्ये त्याला फारसे यश लाभलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याने लेव्हॉन ऍरोनियनविरुद्ध एकमेव विजय संपादन केला असून याशिवाय 2 बरोबरी व 4 पराभव अशी त्याची संमिश्र कामगिरी राहिली आहे.
त्याने अनिश गिरी व क्युयांग लियाम ले यांच्याविरुद्ध बरोबरी प्राप्त केली. मात्र, एरिक हॅन्सेन, डिंग लिरेन, जॉन क्रिस्तोफ व शखरियार मेमेद्यारोव्ह यांच्याविरुद्ध त्याला पराभव पत्करावे लागले होते. काही महिन्यांपूर्वी जागतिक अव्वलमानांकित कार्लसनविरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झालेला रशियाचा इयान नेपोम्नियाची या स्पर्धेत आठ फेऱयांअखेर गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. नेपोम्नियाचीच्या खात्यावर 19 गुण तर डिंग लिरेन व हॅन्सेन यांच्या खात्यावर प्रत्येकी 15 गुण नोंद आहेत.
एअरथिंग्स मास्टर्स ही 16 खेळाडूंचा समावेश असणारी ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धा असून यात विजयाला 3 गुण तर बरोबरीसाठी प्रत्येकी 1 गुण देण्यात येतात. साखळीतील आणखी 7 फेऱया बाकी आहेत.
विविध स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव
प्रज्ञानंदने विजयावर शिक्कामोर्तब करताच त्याच्यावर विविध स्तरावरुन आनंदाचा वर्षाव सुरु झाला. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय कपूर यांनी सर्वप्रथम त्याचे अभिनंदन केले. पृथ्वीतलावरील सर्वोत्तम बुद्धिबळपटू मानल्या जाणाऱया कार्लसनला नमवले असले तरी त्याचा आनंद साजरा करण्याऐवजी स्पर्धेतील पुढील फेऱयांवर माझा फोकस असेल, असे हा युवा ग्रँडमास्टर म्हणाला.
कोण आहे आर. प्रज्ञानंद?
अवघ्या 16 वर्षांचा आर. प्रज्ञानंद हा जागतिक स्तरावरील पाचवा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. अभिमन्यू मिश्रा, सर्जेई कर्जाकिन, गुकेश डी व जावोखिर सिंदारोव्ह यांच्यानंतर त्याने हा पराक्रम गाजवला आहे. कार्लसनविरुद्ध आर. प्रज्ञानंदचा कोणत्याही बुद्धिबळ प्रकारातील हा पहिला विजय आहे. या विजयापूर्वी त्याला सलग तीन डावात पराभव पचवावे लागले आहेत. या स्पर्धेतील 8 फेऱयांअखेर तूर्तास कार्लसन पाचव्या स्थानी आहे.