वार्ताहर /जमखंडी
केरळप्रमाणे आलमट्टी धरण परिसरात अधिकाधिक सुविधा पुरवून पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ बनविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले. आलमट्टी येथे थ्रीडी थ्रिलर थिएटरचे उद्घाटन करून ते बोलत होते. रॉक उद्यानामध्ये सदर कार्यक्रम झाला.
सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हे थ्रीडी थिएटर देशातील तिसरे व कर्नाटकातील पहिले आहे. प्रत्येकी 50 रुपये प्रवेश शुल्क ठेवून एकावेळी 24 जणांना प्रवेश मिळू शकतो. येथे 10 मिनिटांचा देखावा होणार असून दिवसातून 8 वेळा प्रयोग सुरू राहणार आहे.
पर्यटनस्थळाच्या विकासासाठी येथे 30 कोटी रुपये खर्चून यात्री निवासची उभारणी करण्यात येणार आहे. शिवाय आलमट्टीमध्ये बोटीची सोयदेखील करून पर्यटकांना नौका विहाराचा आनंद देण्याबरोबरच रोप-वे देखील निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे आलमट्टी ते नारायणपूर या पाणलोट क्षेत्रात वार्षिक 50 हजार टन मत्स्य उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोविंद कार्जोळ यांनी दिली. यावेळी आमदार शिवानंद पाटील, मुख्य अभियंते एच. सुरेश, डी. बसवराजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.