पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल रविवारी तृणमूल काँग्रेस पक्षाला धक्का देताना या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते पुन्हा घरवापसी (काँग्रेस पक्षात प्रवेश) करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खा. लुईझिन फालेरो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
केंद्रीय नेत्यांची मान्यता हवी : कामत
मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्याला आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या तृणमूल काँग्रेसच्या राजीनाम्याची तसेच पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारी विषयी कोणतीच कल्पना नाही. जर ते पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असतील तर त्यांना केंद्रीय नेत्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे.
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करावा यासाठी माजी मंत्री मायकल लोबो व आमदार विजय सरदेसाई हे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाना यश आल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, त्यावेळी सुद्धा मायकल लोबो व विजय सरदेसाई हे त्यांच्या संपर्कात होते. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. तोपर्यंत रेजिनाल्ड हे ममता बॅनर्जीच्या भेटीसाठी गेले होते.
मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने माघारी
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कुडतरी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रचार करण्यास सुरवात केली होती. परंतु, त्यांना मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात ते केवळ काँग्रेसच्याच उमेदवारीवर विजयी होऊ शकतात हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, त्यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने सासष्टीत तृणमूल काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे.
आलेक्स रेजिनाल्ड यांना शुभेच्छा : महुआ मोईत्रा
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे पत्र मिळाल्याची माहिती पक्षाच्या खासदार – गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी दिली आहे. ते ज्यावेळी पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आता जर ते पक्ष सोडतात तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.