सिद्धरामय्या आक्रमक : सत्ताधारी-विरोधकांत जुंपली
प्रतिनिधी /बेंगळूर
पेट्रोल-डिझेल, गॅससह आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून बुधवारी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. नियम 69 अंतर्गत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित करून युपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारच्या कालावधीपासून एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकारच्या कालावधीपर्यंत वाढविलेल्या अबकारी कराविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी केंद्र सरकारसंबंधीचा मुद्दा येथे उपस्थित करू नका. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, अशा शब्दात खडसावून सिद्धरामय्यांना पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविषयी बोलण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला.
बुधवारी विधानसभेत सिद्धरामय्या यांनी दरवाढीच्या मुद्दय़ावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका सुरू केल्यानंतर कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी मध्येच हस्तक्षेप केला. केंद्र सरकारच्या धोरणांचा, निर्णयांविषयी विधिमंडळ सभागृहात चर्चा करता येते का?, त्यावर आम्ही उत्तर कसे द्यावे?, असा आक्षेप घेतला. तितक्यात आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये वाद-विवाद झाला. दोन्ही पक्षातील नेते एकाच वेळी बोलण्यासाठी उभे राहिल्याने विधानसभेत गदारोळ माजला.
गदारोळतही बोलणे सुरू ठेवताना मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, तुम्ही हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा. येथे हा विषय निरर्थक आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देतील. काँग्रेसने 70 वर्षे लूट केली आहे. आता दरवाढीचा मुद्दा मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप केला. त्यावर अधिकच संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी आपण केंद्र सरकारवर आरोप करत नाही. दरवाढीसंबंधी वास्तविक स्थिती मांडून त्यावर चर्चा घडवून आणत आहे. सिमेंटचे दर वाढले आहेत. याविषयी सभागृहात चर्चा केली नाही तर जनता आपल्याकडे विचारणा करेल, असे सांगितले.
दरम्यान, सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी वाद घालत असलेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कागेरी यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2ः45 पर्यंत पुढे ढकलले.
तुम्हाला दिल्लीला पाठविण्याचे कारस्थान आहे, सावध व्हा!
अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीविषयी बुधवारी विधानसभेमध्ये चर्चा सुरू असतानाच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कोपरखळी मारली. राज्यात भाजपला सत्तेवर आणलेल्या येडियुराप्पांना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरविण्यात आले. असे असताना तुमचा पाय खेचणारे देखील आहेत. तुम्हाला दिल्लीला पाठविण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे सावध व्हा. तुम्ही विधानसभेत असणे हे तुमच्याच पक्षातील काही जणांना मान्य नाही, असा इशारा सिद्धरामय्या यांनी बोम्माईंना दिला.