प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त शनिवार दि.8, व रविवार दि.9 फेब्रुवारी 2020 रोजी 18 वा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. शनिवारी प्रसिध्द गायिका कोमल कनकिया यांचा भव्य ’शिम्फनी ऑर्केस्ट्रा’, तर रविवारी प्रसिध्द गायक कुणाल गांजा वाला यांचा ’लाईव्ह ईन कॉन्सर्ट’हे बहारदार कार्यक्रम इस्लामपूर येथील विद्या मंदीर हायस्कुलच्या क्रीडांगणा वर सायंकाळी 7 वाजता होणार आहेत. ही माहिती आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, व सचिव राजेंद्र घोरपडे यांनी दिली.
राज्याचे जल संपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आविष्कार गेल्या 17 वर्षापासून वाळवा,व परिसरातील सांस्कृतिक अभिरुची वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सांस्कृतिक चळवळीस कला रसिकांचाही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातूनच आम्ही 17 वर्षाचा ’माईल स्टोन’पार करू शकलो आहे.
18 व्या संगीत महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी ख्यातनाम संगीतकार आर.डी.बर्मन (पंचमदा) यांच्या संगीत रचनांचा आविष्कार कोमल कनकिया, व सहकारी करणार आहेत. यामध्ये 50 वादक असून यातील बाबा खान, श्यामराज, आनंद घोगरे, अजय अत्रे, गायक जितेंद्र अभ्यंकर, केदार मोरे आदी पंचमदांच्या समवेत काम केलेले कलाकारही आहेत.
दुसऱया दिवशी तरुणाईच्या ओठावर ज्यांची गाणी रुळली आहेत,ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द गायक कुणाल गांजावाला यांचा लोकप्रिय गाण्यांचा ’लाईव्ह ईन कॉन्सर्ट’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहेत. त्यांनी दिल ना दिया (क्रिस), इस तराह (इन्सान), भिगे ओठ (अन्वर), वाऱयावरती गंध पसरला (सावरखेडे एक गांव) आदी असंख्य हिंदी-मराठी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत.
आविष्कारने ना.पाटील, व कला रसिकांच्या पाठबळावर गेल्या 17 वर्षात कौटुंबिक कला दालन उभा केले असून साधारण 6 हजारच्यावर कलारसिक आपल्या कुटुंबासह आविष्कारच्या कार्यक्रमांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. केवळ पुणे, मुंबईसारख्या मोठय़ा शहरात जसे कार्यक्रम होतात,तसे कार्यक्रम तालुक्याच्या शहरात आयोजन करणारी आविष्कार ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.
आविष्कारने पंडीत जसराज, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, उदित नारायण, कुमार सानू,श्रेया घोषाल, साधना सरगम, अलका याज्ञीक, अभिजित भट्टाचार्य आदी प्रतितयश कलाकारांचे सुमारे 80 च्यावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. आविष्कारचे मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील, उपाध्यक्ष भूषण शहा,सहसचिव प्रा.कृष्णा मंडले, खजिनदार राजेंद्र माळी, माजी अध्यक्ष सुधीर पाटील, सतीश पाटील, माजी संचालक डी.बी.पाटील, राजवर्धन लाड, डॉ.अतुल मोरे, लव्हाजी देसाई, अतुल पाटील, विकास कोरे, विश्वनाथ पाटसुते, अजय थोरात यांच्यासह आविष्कारचे सदस्य 18 वा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
’आविष्कार’च्या सभासद नोंदणी सुरू!
अविष्कारला सातत्याने कला रसिकांचे मोठे पाठबळ मिळाले आहे.
आविष्कारची सभासद नोंदणी सुरू आहे. रसिकांनी आपली नोंदणी करून महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन ही करण्यात आले.