डॉ. आसावरी संत यांचे होणार व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेचा वर्धापन दिन सोमवार दि. 8 रोजी दुपारी 3.30 ते 6.30 या वेळेत वरेरकर नाटय़संघाच्या सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. आसावरी संत उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘कोरोना ः काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.
डॉ. आसावरी संत यांचा परिचय पुढीलप्रमाणे….
डॉ. आसावरी संत यांचा जन्म नागपूरमध्ये झाला असून पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी इएनटी विभागात गुणवत्ता श्रेणीसह एमबीबीएसची पदवी घेतली आहे. जेएनएमसी बेळगावमधून त्यांनी विशेष गुणवत्तेसह एमडी पदवी घेतली आहे. केएलई हॉस्पिटलमध्ये काही वर्षे त्यांनी काम केले आहे. सन 1999 पासून ‘आभा डायग्नोस्टिक्स’ ही स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. दक्षता हॉस्पिटलच्या त्या पॅथॉलॉजिस्ट असून याच हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक, उपाध्यक्षा आणि अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या हॉस्पिटलच्या त्या संचालक मंडळामध्ये आहेत. महावीर रक्तपेढी व डेक्कन मेडिकल सेंटर येथेही त्यांनी काम केले आहे.
विविध संस्थांमध्ये सेवा
आयएमए, इनरव्हील क्लब, ऋणानुबंध या संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. तसेच गेल्या 12 वर्षांपासून विविध वैद्यकीय महाविद्यालयात मानद प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत. वाचन करणे, प्रवास करणे आणि संगीत ऐकणे हा त्यांचा छंद आहे.