चेअरमन हणमंत कुगजी यांच्या कार्याबद्दल कौतुक
प्रतिनिधी / येळ्ळूर
येथील गरीब कुटुंबांना आशादीप सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे चेअरमन हणमंत लुमान्ना कुगजी व उज्ज्वला हणमंत कुगजी आणि सदस्य परशराम खेमणाकर यांनी कीट वाटप केले. ग्रामपंचायत आजी-माजी सदस्यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले. यावेळी हणमंत कुगजी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
आशादीप सोसायटीतर्फे नेहमीच गरिबांना मदत करण्यात आली आहे. तालुक्मयातील अनेक गावांमध्ये या सोसायटीच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्याचे वाटप केले आहे. खानापुरातील दुर्गम भागातील गरिबांना किटचे वाटप केले होते.
येळ्ळूरमध्ये गरीब कुटुंब असलेल्यांचा सर्व्हे करून माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांची नावे दिली. त्यानंतर त्यांना हे वितरण केले. कोरोनाचे नियम पाळत 78 कुटुंबांना हे कीट देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील उपस्थित होते.
यावेळी एक दिव्यांग आजीबाई यांनी आपणाला गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शन नाही. मात्र तुम्ही आम्हाला जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले याबद्दल आभार मानले. 7 किलो तांदूळ, 5 किलो गहू, दोन किलो तुरडाळ, दोन किलो मूगडाळ, एक किलो गूळ, 200 ग्रॅम तिखट यासह इतर साहित्य देण्यात आले. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य महेश कानशिडे, प्रमोद पाटील, रमेश मेणसे, राकेश परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश देसूरकर, शिवाजी पाटील, जयसिंग रजपूत, सुरज गोरल, तानाजी पाटील, शिवाजी कदम आदी उपस्थित होते.