प्रतिनिधी / सांगली
नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या चर्चेत बेमुदत संप प्रकरणी तडजोड घडवून आणण्यात आली.
बैठकीत झालेल्या समझोत्यानुसार आशा वर्करना 1 जुलै 2021 पासून 1500 रु. व गटप्रवर्तकांना 1700 रू. दरमहा वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण या कामी आशांना दरमहा 1000 रु व गटप्रवर्तकना 1200 रु. निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून 500 रु. कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहेत. तसेच पुढील वर्षी 1 जुलै 2022 पासून आशा व गटप्रवर्तकांना 500 रु. निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळणार आहे. या प्रकारे आशाना 2000 रू. व गटप्रवर्तकांना 2200 रु. वाढ मिळण्याचा समझोता यावेळी करण्यात आला.
आशा व गट प्रवर्तकांच्या कामकाजाबाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील. तसेच व्हॅक्सिनेशनच्या मोहिमेमध्ये सोशल मोबिलाइजर व ग्राउंड मॅनेजमेंट या प्रकारची कामे करण्यासाठी 200 रुपये प्रति दिन भत्ता देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांसाठी आशा निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम. ए. पाटील, डॉ. डी. एल. कराड ,राजू देसले, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग यांनी चर्चेत भाग घेतला.