लसीकरणातील मानधन, सर्वेक्षण भत्ते थकवल्याने आक्रमक
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कामाचे जानेवारी 2021 पासूनचे रखडलेले मानधन आणि केंद्र शासनाकडून मंजूर असूनही थकीत असलेले कोरोना सर्वेक्षण भत्ता त्वरीत मिळवा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने महापालिकेवर लाटणे मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली.
महापालिकेच्या सभागृहात सदस्यांनी आशा वर्कर्सना कोरोना साथ संपेपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव मंजूर होवूनही पाच महिन्यांपासून दिलेला नाही. 220 आशा वर्कर्सना रोजचे 200 रूपये प्रमाणे लसीकरणातील कामांचे मानधन मिळालेले नाही. यासह दिव्यांग सर्वेक्षणचे थकीत मानधन मिळावे. ‘हर घर दस्तक’ सर्व्हेचे मानधन मिळावे. जिल्हा परिषदप्रमाणे मनपानेही उत्कृष्ट आशा पुरस्कार सुरू करावा. मानधनामध्ये कपात करू नये. केएमटी बसचा पास मिळावा, अशा मागण्या केल्या. यावेळी ज्योती तावरे, नेत्रदिपा पाटील, उज्वला पाटी, संगिता पाटील, सरिता मोरे, निशा कांबळे आदी उपस्थित होते.