खासदार राऊत यांना युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते यांचे निवेदन
चिपळूण
कोरोना काळात तालुक्यातेल आशा सेविका गावोगावी सर्वेक्षणासाठी जाऊन आजही महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना मानधन वाढवून देण्याच्या निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तरी त्यांचा मानधन प्रश्न सोडवण्याची मागणी युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील आशा सेविका आरोग्य कर्मचाऱयांच्या खांद्याला खांदा लावून गावोगावी सर्वेक्षणासाठी काम करत आहेत. दररोजच्या तीस रुपयांसाठी आशा सेविका गावोगावी पायपीट करत आहेत. काही वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱया या सेविका गरोदर माता, लहान मुलांचे सर्वेक्षण करतात. त्याचबरोबर तापाचे रुग्ण, मलेरिया, डेंग्यू, कुष्ठरोग, क्षयरोगाच्या रुग्णांचे तसेच प्रधानमंत्री मातृत्व योजना, जननी सुरक्षा योजनेच्या सर्वेक्षणासाठी त्यांना रुग्णामागे मानधन मिळते व तेही अत्यल्पच आहे.
कोरोना काळात आशा सेविका आरोग्य कर्मचाऱयांच्या बरोबरीने रुग्णांचे सर्वेक्षण करत असून धोक्याच्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांची अत्यल्प मानधनावरच बोळवण केली जात आहे. कोरोना काळात त्यांना ग्रामपंचायत स्तरावर दरमहिना एक हजार रुपये वाढीव मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. एप्रिल महिना वगळता पुढील एकाही महिन्याचे वाढीव मानधन त्यांना मिळालेले नाही. एक हजार वाढीव मानधनाचे दिवसाला केवळ तीस रुपये होतात. त्यांना कोरोना योद्धा म्हणून 50 लाखांचे विमा कवच आणि लागण होणाऱया कर्मचाऱयांना मोफत उपचार मिळावेत, अशी मागणीही खताते यांनी खासदार राऊत यांच्याकडे केली. आशा सेविकांच्या प्रश्नांवर खासदार राऊत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मंत्रालयीन स्तरावर तातडीने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.