प्रतिनिधी / जयसिंगपूर
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ होणार असल्याचे सांगताना राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, आशा स्वयंसेविकेना दरमहा रुपये एक हजार तर गटप्रवर्तक यांच्या मानधनात दरमहा रुपये बाराशे रुपयाची वाढ करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. ही वाढ जुलै २०२१ पासून लागू होईल, मानधनामधील या वाढी मुळे १३५ कोटी ६० लाखांचा खर्च राज्य शासनाचा वाढणार असल्यामुळे या वाढीव खर्चास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गाच्या काळात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरमहा रुपये पाचशे इतका अतिरिक्त भत्ता देण्याचे सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने निश्चित केले आहे.
मागील दीड पावणे दोन वर्षांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी फ्रंटवर राहून कोरोना महामारीच्या लढ्यामध्ये शासनाला सहकार्य करताना स्वतःच्या जीवाची अथवा परिवाराची काळजी न करता राज्यातील जनतेची निरंतर सेवा बजावली आहे, आपल्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी या घटकांची सातत्याने होत होती. आशा स्वयंसेविका यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे आपल्या भावना आपणासमोर व्यक्त केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी यांच्यासमोर या सर्व घटकांचे प्रश्न आपण मांडले होते. शेवटी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्यामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचे काम झाले असल्याची माहिती शेवटी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.