आशा कर्मचाऱयांचे जिल्हाभर निषेध आंदोलन
प्रतिनिधी/कोल्हापूर
भाषण नको रेशन द्या अशी घोषणाबाजी करित अशा कर्मचाऱयांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी निषेध दिन साजरा केला. कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिह्यातील सर्व तालुक्यातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱया आशा कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर अमलबजावणी करीत हे आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांचा सरकारने गांभिर्याने विचार करावा, अन्यथा भविष्यात सरकारला सळो की पळो करुन सोडू असा खणखणीत इशारा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी दिला आहे.
आंदोलनात जिल्हय़ातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 512 ठिकाणी व इचलकरंजी, कोल्हापूर शहर अंतर्गत 2700 आशा वर्कर, कोल्हापूर शहर 90, इचलकरंजी शहर 40 अशा कर्मचारी सहभागी झाल्या. प्रत्येक उपकेंद्र समोर आशा व गटप्रवर्तक यांनी काळय़ा फिती बांधून काम केले. मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन घोषणा देत निषेध व्यक्त केला.
आंदोलनात जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील, सचिव उज्वला पाटील, संगीता पाटील कोषाध्यक्ष माया पाटील, मनीषा पाटील, विमला आतिगरे, सुप्रिया गुडले ज्योती तावरे, मंदाकिनी कोडक, ज्योती पाटील, भिका ताई कांबळे, पद्मजा सामंत, पुनम माळी, राधिका घाडगे, सारिका पाटील, अनिता अनुसे, महादेव कोळी, सुराया तेरदाळे, प्रतिभा इंदूरकर, गीता गुरव, शुभांगी बेलेकर अर्चना कुलकर्णी उज्वला जडे, वसुधा बुडके. नंदिनी करडे पुनम कुंभार सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या
-आशा व इतर आरोग्य कर्मचाऱयांना पुरेशा सुरक्षा साधनांची व्यवस्था करा
-स्थलांतरीत कामगारांना अन्न व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करा
-कोरोना सर्वेक्षणसाठी किमान 200 रुपये प्रतिदिनी मोबदला द्या
-आयकर न देणाऱया सर्व कुटुंबाना तातडीने 3 महिन्यापर्यंत मासिक किमान 7500 रुपये रोख रक्कम थेट रक्कम द्यावी
-आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱयाचा दर्जा द्यावा, 7 आशा व गटप्रवर्तक यांचा 2000 रुपये मानधन वाढीचा जीआर व गटप्रवर्तक यांचा दुरुस्ती सहित ताबडतोब निर्गमित करावा.
-गटप्रवर्तक याना प्रोत्साहन भत्ता जाहीर करावा. ख
-आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करा.
आमच्या हक्काचे दाम मिळाले पाहिजे
आम्ही सरकारकडे कोणतीही अवास्तव मागणी केली नाही. आमच्या हक्काचे दाम मिळाले पाहिजे इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. सरकारने ती पूर्ण करावी. -उज्वला पाटील, सचिव, अशा वर्करस फेडरेशन