क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
ताजिकिस्तान येथे झालेल्या आशियाई कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावची सुकन्या मलप्रभा जाधव हिने 48 किलोग्रॅम वजनगटात कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. मलप्रभाने यापूर्वी 2018 मध्ये देखील आशियाई कांस्य जिंकले आहे. तिला जितेंद्र सिंग व त्रिवेणी सिंग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
ताजिकिस्तान येथील स्पर्धेत पहिल्या फेरीत मलप्रभाने लंकन प्रतिस्पर्धीला तर दुसऱया फेरीत तुर्कस्थानच्या प्रतिस्पर्धीला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिला उझ्बेकच्या कुराशपटूकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली असल्याने या निकषावर ती कांस्यपदकाची मानकरी ठरली.