9-0 फरकाने धुव्वा, दिलप्रीत सिंगची हॅट्ट्रिक, जर्मनप्रीत सिंगचे दोन गोल
वृत्तसंस्था /ढाका
विद्यमान विजेते आणि ऑलिम्पिक कांस्यविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील दुसऱया सामन्यात यजमान बांगलादेशचा 9-0 असा एकतर्फी धुव्वा उडवून पहिला विजय नोंदवला. भारताच्या दिलप्रीत सिंगने हॅट्ट्रिक नोंदवली तर जर्मनप्रीत सिंगने दोन गोल केले.
भारतातर्फे दिलप्रीतने (12, 22, 45 वे मिनिट) तीन मैदानी गोल केले तर जर्मनप्रीत सिंगने (33 व 43 वे मिनिट) पेनल्टी कॉर्नर्सवर दोन गोल नोंदवले. याशिवाय ललित उपाध्यायने 28 व्या मिनिटाला उपकर्णधार हरमनप्रीत सिंगकडून पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या पासवर गोल केला तर आकाशदीप सिंगने 54 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. मनदीप मोरने देशातर्फे खेळताना 55 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर 57 व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एका गोलाची भर घालताना संघाला मिळालेल्या 13 व्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱया भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. येथील स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात कोरियाने त्यांना 2-2 असे बरोबरीत रोखले होते.
शुक्रवारी भारताचा राऊंडरॉबिनमधील पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील सामने स्टार स्पोर्ट्स वाहिनींवरून दाखविण्यात येत आहेत. राऊंडरॉबिनमधील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होत आहेत.
पहिल्या सामन्यातील बरोबरीनंतर भारताने बांगलादेशविरुद्ध निर्धारी खेळ करीत प्रारंभापासूनच पहिल्या दोन सत्रात बांगलादेशवर पूर्ण वर्चस्व गाजविले. सुरुवातीपासूनच आक्रमण करीत भारताने पहिल्या 12 मिनिटांत तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. मात्र भारताला गोल करण्यात यश आले नाही. बांगलादेशने प्रतीक्षा करण्याच्या खेळावर भर देत भारताची आक्रमणे थोपवण्याचे काम केले. पेनल्टी कॉर्नर्सवर बांगलादेशचा गोलरक्षक अबू निप्पॉनने चमकदार प्रदर्शन करीत भारताला अधिक यश मिळू दिले नाही. 12 व्या मिनिटाला दिलप्रीतने मैदानी गोल नोंदवत भारताला पहिले यश मिळवून दिले. सर्कलच्या बाहेरून कर्णधार मनप्रीत सिंगकडून मिळालेल्या पासवर त्याने हा गोल नोंदवला. दुसऱया सत्रात बांगलादेशच्या बचावातील त्रुटीचा लाभ घेत 22 व्या मिनिटाला दिलप्रीतने भारताचा दुसरा गोल नोंदवला. एका फ्रीहिटवर सुमित वाल्मिकीने दिलप्रीतकडे चेंडू सोपवला, त्यावर त्याने रिव्हर्स हिटवर हा गोल नोंदवला. 28 व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर चेंडू डिफ्लेक्ट केला. त्यावर ताबा घेत ललितने गोल नोंदवत भारताची आघाडी 3-0 अशी केली. मध्यंतरानंतर तिसऱया मिनिटाला जर्मनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल नोंदवला. 43 व्या मिनिटाला पुन्हा त्यानेच पेनल्टी कॉर्नरवर संघाचा पाचवा गोल केल्यानंतर दोन मिनिटांनी दिलप्रीतने वैयक्तिक तिसरा व संघाचा सहावा गोल नोंदवला. यानंतरही भारताने आक्रमणे चालूच ठेवली आणि 54, 55, 57 व्या मिनिटाला आणखी तीन गोलांची भर घालत एकतर्फी विजय साकारला.