वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरियातील देगू येथे सुरू असलेल्या 15 व्या आशियाई एअर गन नेमबाजी स्पर्धेत भारताने एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व राखताना आणखी चार सुवर्णपदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 17 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत भारताच्या शिवा नरवालने कोरियाच्या पार्क देहूनचा अंतिम फेरीत 17-13 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर कनिष्ठ पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत भारताच्या सागर डांगीने सुवर्णपदक मिळवताना अंतिम लढतीत आपल्याच देशाचा नेमबाज सम्राट राणाचा 17-13 अशा गुणांनी पराभव केला. या क्रीडा प्रकारात सम्राट राणाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उझ्बेकच्या केमालोव्हने कास्यपदक घेतले. त्यानंतर भारताच्या पुरुष आणि महिला युवा संघांनी सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल युवा सांघिक विभागात भारताच्या संदीप बिश्नोई, साहिल आणि अमित शर्मा यांनी कोरिया संघावर 16-8 अशी मात करत सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल युवा विभागात भारताच्या कनिष्का डागर, यशस्वी जोशी आणि हर्नवदीप कौर यांनी कोरियन संघाचा 16-14 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले.
या स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या अर्जुन बबुटा आणि मेहुली घोष यांनी 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. अर्जुन बबुटा आणि मेहुली घोष यांनी अंतिम लढतीत भारताच्या किरण अंकुश जाधव व इलाव्हेनील वलरिवन यांचा 16-10 असा पराभव केला. महिलांच्या सांघिक विभागात यापूर्वी मेहुली आणि इलाव्हेनील यांनी सुवर्णपदक पटकावले होते. 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठांच्या विभागात भारताच्या पनवाल आणि रमिता यांनी सुवर्ण पदक पटकावताना आपल्या देशाच्या श्रीकार्तिक शबरीराज रवीशंकर आणि नॅन्सी यांचा 17-11 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत वैयक्तिक गटात दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. महिलांच्या युवा 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीत भारताच्या कनिष्का डागरने कास्यपदक मिळवले. कनिष्ठ पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल विभागात संदीप बिश्नोईने सुवर्णपदक घेतले आहे. सदर स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.