भारतातील कोरोना प्रकोपामुळे घेण्यात आला निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात येथे होणारी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आता दुबईला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. देशातील कोरोनाच्या महाप्रकोपाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यूएईसमवेत भारतीय फेडरेशन या स्पर्धेचे सहयजमान असणार आहे.
21 ते 31 मे या कालावधीत ही स्पर्धा दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणार होती. दिल्लीमध्ये सध्या वीस हजारहून जास्त कोरोना रुग्ण रोज आढळत आहेत. ‘जगभरातील अनेक देशांनी भारतावर हवाई प्रवासबंदी घातली असल्याने आशियाई बॉक्सिंग फेडरेशनशी (एएसबीसी) चर्चा केल्यानंतर आशियाई इलाईट पुरुष व महिलांची बॉक्सिंग चॅम्पियनशिप दुबईला घेण्याचा निर्णय भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) घेतला आहे,’ असे बीएफआयने निवेदनाद्वारे सांगितले. दुबईमध्ये या स्पर्धेचे आयोजन यूएई बॉक्सिंग फेडरेशनच्या सहकार्याने बीएफआय करणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
‘कोरोनामुळे भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक देशांनी भारतातील प्रवासावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बीएफआय व एएसबीसी यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा दुसऱया ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचेही बीएफआयने म्हटले आहे. भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनीही, हा निर्णय घेणे खूपच कठीण होते. पण तो घ्यावा लागणे आवश्यकच होते. ही स्पर्धा भरविण्यास आम्ही उत्सुक होतो. पण दुर्दैवाने त्याचे ठिकाण आम्हाला बदलणे भाग पडले आहे. आमच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता, असे सांगितले. बॉक्सर्सची सुरक्षितता याला आमचे प्राधान्य असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. परिस्थितीचे अवलोकन करून सविस्तर चर्चा केल्यानंतर स्पर्धा दुबईत घेण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
आता ही स्पर्धा 21 मे ते 1 जून या कालावधीत घेतली जाणार असल्याचे एएसबीसीने स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र महिला संघाची निवड घोषित करण्यात आली असून एमसी मेरी कोमचा (51 किलो) त्यात समावेश आहे.