वृत्तसंस्था/ शहा आलम (मलेशिया)
येथे मंगळवारपासून आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील नवोदित युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहील.
सदर सांघिक बॅडमिंटन स्पर्धा पुरूष आणि महिला अशा दोन गटामध्ये खेळविली जाणार आहे. भारतीय पुरूष संघाचा समावेश अ गटामध्ये करण्यात आला असून त्यांचा सलामीचा सामना कोरियाबरोबर होणार आहे. भारतीय महिला संघाचा समावेश वाय गटात करण्यात आला असून त्यांची सलामीची लढत मंगळवारी यजमान मलेशियाबरोबर होणार आहे. भारतीय पुरूष संघाचे नेतृत्व विश्व बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा लक्ष्य सेन करीत आहे. भारतीय पुरूष संघामध्ये लक्ष्य सेन, किरण जॉर्ज आणि मिथुन मंजुनाथ या नवोदित बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. पुरूषांच्या विभागात अ गटामध्ये भारत तसेच तीनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱया इंडोनेशिया, हाँगकाँग आणि कोरिया यांचा समावेश आहे. किरण जॉर्जने अलिकडेच ओडिशा सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविले आहे. विश्व बॅडमिंटन टूरवरील त्याचे हे पहिले विजेतेपद आहे. मिथुन मंजुनाथने अलिकडे झालेल्या सय्यद मोदी सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली होती. दुहेरीमध्ये पी.एस. रवीकृष्णा आणि शंकर प्रसाद उदयकुमार त्याचप्रमाणे मनजीत सिंग आणि डिंकू सिंग हे भारताचे प्रतिनिधीत्व करतील.
महिलांच्या विभागात भारतीय संघातील मालविका बनसोडने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात आकर्षी काश्यप, अस्मिता चलीहा या नवोदितांचा समावेश आहे. पहिल्या लढतीत भारतीय महिला बॅडमिंटनपटूंची बलाढय़ मलेशिया आणि विद्यमान विजेत्या जपानविरूद्ध सत्वपरीक्षा ठरणार आहे.
या स्पर्धेत पुरूष आणि महिला विभागातील प्रत्येक गटातील पहिले दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचप्रमाणे हे संघ 17 ते 22 मे दरम्यान बँकॉकमध्ये होणाऱया थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरतील. मलेशियात या सांघिक स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू, काश्यप या सीडेड खेळाडूंनी आपला सहभाग दर्शविलेला नाही. 1965 साली झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या दिनेश खन्नाने एकमेव सुवर्णपदक जिंकले होते आणि वैयक्तिक गटात भारताने आतापर्यंत अकरा कांस्यपदके मिळविली होती. मंगळवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत थायलंड, चीन तैपेई आणि चीन यांनी कोरोना समस्येमुळे माघार घेतली आहे.