वृत्तसंस्था/ मुंबई
गुरुवारपासून येथे खेळविल्या जाणाऱया महिलांच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने कोरोना महामारी समस्येमुळे रद्द केले जाणार नाहीत, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी येथे केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया संघात 13 खेळाडू उपलब्ध असल्यास हे सामने रद्द करण्याची गरज भासणार नाही. अलीकडेच भारतामध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. पण या स्पर्धेदरम्यान कोरोनासंदर्भातील सर्व नियमावलींची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. कदाचित कोरोना चाचणीत एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल आणि संबंधित संघाला सामना खेळण्यास परवानगी दिली जाईल. सदर स्पर्धेमध्ये एकूण 12 महिला फुटबॉल संघांचा समावेश आहे. चालू वषीच्या ऑक्टोबरमध्ये फिफा महिलांच्या 17 वर्षाखालील वयोगटाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा भारतात घेतली जाणार आहे. एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील तीन स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांविना खेळविले जाणार आहेत.