अनगोळ-अलारवाड येथे योजना राबविणार
प्रतिनिधी / बेळगाव
आश्रय योजनेंतर्गत गरजूंना घरे देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. अनगोळ व अलारवाड येथील जागेत तीन मजली इमारतीचे बांधकाम करून लाभार्थींना घरे देण्यात येणार आहेत. याकरिता लाभार्थींनी ठरावीक रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम भरण्यासाठी विविध बँका सरसावल्या असून, लाभार्थींची बैठक घेऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
महापालिकेकडून वाजपेयी आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना, राजीव गांधी आवास योजना अशा योजनांतर्गत गरजूंना घरांसाठी निधी देण्यात येतो. पण ज्यांच्याकडे घरे बांधण्यासाठी जागा नाही अशांना घरे देण्यात येतात. मात्र, महापालिकेकडे जागा नसल्याने ही योजना 2005 पासून रखडली आहे. त्यावेळी असंख्य नागरिकांनी आश्रय घरासाठी 5 हजार रुपये महापालिकेकडे भरणा केले होते. मात्र, जागेअभावी त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. पण महापालिकेने दोन ठिकाणी जागा खरेदी करून ही योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, 6 लाख 35 हजार रुपये एका घरासाठी खर्च अपेक्षित आहे. यापैकी सामान्य लाभार्थींना 3 लाख 35 हजार रुपये रक्कम भरावी लागते. तसेच मागासवर्गीयांना 2 लाख 73 हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे.
आश्रय योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची यादी तयार करून 1481 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. मात्र, लाभार्थींनी रक्कम भरणा केली नसल्याने ही रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. नागरिकांना अर्थसाहाय्य करण्याची सूचना विविध बँकांना नगरविकास खात्याने केली आहे. त्यामुळे शहरातील विविध बँकांनी बुधवारी महापालिका कार्यालयात लाभार्थींची बैठक घेऊन गृहकर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली.
अर्ज करण्याची सूचना
बँकेचे नियम व अटी तसेच किती रक्कम घराकरिता देण्यात येणार आहे, याची माहिती लाभार्थींना देण्यात आली. त्यामुळे लाभार्थींना रक्कम भरण्यासाठी विविध बँका सरसावल्या आहेत. शासनाकडून राजीव गांधी आवास योजनेंतर्गत निम्मी रक्कम देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थींना स्वतः भरावी लागणार आहे. त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी बँका अर्थसाहाय्य करणार आहेत. ज्या लाभार्थींना घराकरिता रक्कम भरावयाची आहे त्यांनी बँकेकडे किंवा महापालिकेच्या आश्रय विभागात अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज देण्याकरिता लाभार्थींनी महापालिकेच्या आश्रय विभागात गर्दी केली होती.