आष्टा / वार्ताहर
आष्टा शहरात कोरोनाने एका माजी नगरसेवकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे शहरात कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे. तसेच मंगळवारी मयत झालेल्या माजी नगरसेवकाच्या कुटुंबांतील दोन महिलानांही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या पंधरा झाली आहे. शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने शहरवासीयांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आष्टा येथील एका माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली. याच कुटुंबांतील दोन महिलांचा रिपोर्ट मंगळवारी पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी माजी नगरसेवकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
शहरात मंगळवार पर्यंत १५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून तीन रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. तर शहरातील ११ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पालिकेच्या एका अधिकाऱ्यासही कोरोनाची लागण झाली आहे. सातत्याने रुग्ण संख्या वाढत चालल्याने शहरवासीयावर मोठे संकट उभे राहिले आहे.
पालिकेच्या अधिकार्यास लागण झाल्याने तसेच शहरात सातत्याने रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिका प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.पालिका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील यांनी केले आहे.