आष्टा/प्रतिनिधी
आष्टा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे ऊस तोडणी मशीन जळून खाक झाले. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आष्टा येथील हावळवाट परिसरात राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतामध्ये हार्वेस्टिंग मशिनच्या साहाय्याने ऊस तोडणी सुरू होती. श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली साखर कारखान्याच्या वतीने ही ऊस तोडणी सुरू होती. दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ऊस तोडणी मशीनला अचानक आग लागली. आणि मशीनने पेट घेतला. ही आग वाढतच गेल्याने मशीन जाळून खाक झाले.
यानंतर परिसरातील ऊसाच्या फडांनाही आग लागली. या वेळी 30 ते 35 एकर ऊस जळून खाक झाला. उसाला आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच ऊस तोडणी मशीन जळाल्याने 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले. सांगोला तालुक्यातील कोटेवाडी येथील नामदेव शेंबडे यांच्या मालकीचे हे मशीन होते.
आग लागल्याचे समजताच आष्टा पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी तसेच कारखान्याचे अधिकारी शेतकरी घटनास्थळी हजर झाले. तर काही दिवसांपूर्वी बागणी येथेही ऊस तोडणी मशीन आग लागून खाक झाले होते.