निधी / काणकोण
पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली पुरी हयात खर्च केलेल्या पैंगीण-काणकोण येथील रामकृष्ण नारायण फळदेसाई (वय 75 वर्षे) यांचे 22 रोजी वास्को येथे निधन झाले. त्याचठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फळदेसाई यांनी आपली पत्रकारितेची कारकीर्द दै. उजवाडमधून सुरू केली होती. त्यानंतर दै. नवप्रभाचे मुख्य उपसंपादक, दै. गोंमंतकचे सहसंपादक या पदांपर्यंत ते पोहोचले. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे जगाच्या पाठीवर हे सदर खूपच गाजले होते. द्वा. भ. कर्णिक, शांताराम बोकील, माधव गडकरी, वामन राधाकृष्ण, दत्ता सराफ, नारायण आठवले अशा संपादकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले होते. सडेतोड स्वभावाच्या फळदेसाई यांनी ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांना सतत विरोध केला.
स्व. लक्ष्मीनारायण पारज, स्व. रामकृष्ण फळदेसाई, डॉ. पांडुरंग फळदेसाई आणि महेंद्र फळदेसाई यांचा नाटय़वेडा गोमंतक हा कार्यक्रम संपूर्ण गोव्यात गाजला होता. सांत इनेज येथील सीता स्मृती लॉजमध्ये राहत असताना काणकोण तालुक्यातून ज्या व्यक्ती कामानिमित्त पणजीला आल्या होत्या त्या सर्वांना बरोबर घेऊन काणकोणच्या विकासाच्या बाबतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पणजीचे सीता स्मृती लॉज हे त्या काळात काणकोण माहिती केंद्र बनले होते.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रभाकर भुसारी, कला अकादमीचे विनायक खेडेकर आणि वामन राधाकृष्ण यांच्या माध्यमातून 1975 ते 1980 या कालावधीत पैंगीण हे सांस्कृतिक केंद्र बनावे यासाठी त्यांनी काम केले होते आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणले होते. अनारोग्यामुळे मागच्या काही वर्षांपासून ते वास्को येथे आपल्या मुलीसोबत राहत होते. गेल्या वर्षी काणकोण पत्रकार संघाने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानपत्र बहाल केले होते. त्यांच्या निधनावर काणकोण पत्रकार संघाने दुःख व्यक्त केले आहे.