ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कमला कॉलेजमधील पदवीची अंतिम वर्षाची विद्यार्थीनी आसमा कुरणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी 6 वाजता तिरंगा हातात घेवून 14 तासांच्या आत 72 किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे. कमला कॉलेज ते जयसिंगपूर, पुन्हा कमला कॉलेजपर्यंत असा मार्ग आहे. तिच्या दुसर्या हातातील मोबाईलमध्ये इंडिया प्लॅग रनर्स कंपनीची जीपीएस सिस्टम असल्याने, तिच्या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक रेकॉर्डमध्ये होणार आहे, अशी माहिती ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, 72 किलोमीटर धावत असताना कोठेही न थांबता रेकॉर्ड करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या मोबाईलमधील जीपीएस सिस्टम एक क्षणही बंद पडल्यास रेकॉर्ड पूर्ण करण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे अतिशय अवघड असलेला धावण्याचा हा प्रकार ती पूर्ण करणार आहे. तसेच 6 व 7 फेब्रुवारी रोजी मुंबई स्टेडियम रन या स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रकारात सलग 12 तास धावून वर्ल्ड चॅम्पीयनशिप व आशिया ओसेनिया चॅम्पीयनशिप जागतिक पातळीवरील स्पर्धेत पात्र होऊन भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे तिचे ध्येय आहे. यापूर्वी 9 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत आसमाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी पोलीस मुख्यालय, मुंबई येथे पोलीस महासंचालक व आय. पी. एस. अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आसमाला एक लाख रूपयांचा धनादेश व गौरवचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पवार, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक एस. के. मिसाळ, ज्योती गावडे, टी. के. सुर्यवंशी, आर. बी. पाटील, प्रा. अनिल घस्ते, डॉ. सुजय पाटील आदी उपस्थित होते.