ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात गॅस गळतीमुळे विहिरीत लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवता आले नाही आहे. या आगीत अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक आसामचा माजी फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्लोव गोगोई आणि टिकेश्र्वर गोहेन हे ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या अग्निशमन विभागात सहायक ऑपरेटर होते. आग विझविण्याच्या प्रयत्नात ओएनजीसीच्या अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ भाजला आहे.
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून गॅसची अनियंत्रित गळती सुरू होती. त्यानंतर ऑईल इंडिया चे हे दोन जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मंगळवारी हे दोघे हरवले. त्यानंतर बुधवारी एनडीआरएफच्या एका दलाने त्यांचे मृतदेह शोधून काढले आहेत.
दुर्लोव गोगोई यांनी 19 वर्षाखालील आणि 21 वर्षाखालील गटात अनेक स्पर्धांमध्ये आसाम चे प्रतिनिधित्व केले आहे.
दरम्यान, या प्रचंड आगीमुळे आजूबाजूच्या जंगलातील काही भाग, घरे आणि वाहनांना देखील आग लागली होती. तसेेेच ही आग विझविण्यासाठी चार आठवडे किंवा एक महिना लागू शकतो असे सांगितले जात आहे.