ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसाममध्ये उल्फाच्या पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दल आणि आसाम पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि नागालँडच्या सीमा भागात उल्फाचे दहशतवादी वास्तव्यास असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.त्यानुसार, सुरक्षा जवानांनी शोध मोहीम राबवली. सीमाभागात असणाऱ्या आसाममधील एका गावातील घरात लपलेल्या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रायफली, पिस्तुल, जिलेटीन, डिटोनेटर्स असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी दोघे स्फोटके बनवण्यात तज्ञ असल्याचे समजते. दहशतवाद्यांना वास्तव्यास घर दिल्याप्रकरणीसंबंधित घरमालकलाही अटक करण्यात आली आहे.