गस्तीवर असताना जवानांवर गोळीबार
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. गोळीबाराची ही घटना सोमवारी सकाळी 9.20 वाजता पेंगेरी-डिगबोई रस्त्यावर बडपठारजवळ घडली. भारतीय लष्कराची तुकडी या भागात गस्तीवर असतानाच जवानांवर गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराने लगेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात पळून गेले. गोळीबारात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. दहशतवाद्यांच्या शोधार्थ लष्कराने विशेष शोध व बचाव मोहीम हाती घेतली आहे.
तीनसुकिया जिह्यातील अप्पर दिहिंग जंगल परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. ही चकमक किमान 10 मिनिटे चालली. तिनसुकिया जिह्यातील पेंगेरी पोलीस स्टेशन अंतर्गत डिगबोई-पेंगेरीला जोडणाऱया रस्त्यावर अप्पर दिहिंग वनक्षेत्राच्या मध्यभागी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराला या भागात 5 उल्फा कॅडर लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कराची तुकडी विशेष गस्त घालण्यासाठी गेली. गोळीबाराच्या घटनेनंतर डिगबोई-पेंगेरी रस्ता बंद करण्यात आला आहे. हल्लेखोर दहशतवादी अजूनही जंगल परिसरात लपून बसल्याचा लष्कराच्या अधिकाऱयांना संशय आहे. लष्कराने संपूर्ण वनक्षेत्र व्यापले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.