आसाम गणपरिषद आणि युपीपीएलशी युती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 70 उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. या निवडणुकीत भाजप आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) या पक्षांशी युती करणार आहे. युतीचे जागावाटपही घोषित करण्यात आले असून भाजप 92 जागांवर लढणार आहे.
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. त्यापैकी आसाम गणपरिषदेला 26 तर युपीपीएल पक्षाला 8 जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागी भाजप लढणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि ज्येष्ठ मंत्री हिमांत बिस्व सर्मा हे अनुक्रमे माजौली आणि जालुकबारी मतदारसंघांमधून पुन्हा लढतील. भाजपने आपल्या 11 विद्यामान आमदारांना तिकिट नाकारले असून त्यांच्याऐवजी नव्या चेहऱयांना संधी देण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली असून या परिषदेला आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) या पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. आसाममध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
काँगेस, डाव्या आघाडीची युती
पश्चिम बंगालमध्ये काँगेस आणि डाव्या आघाडीच्या युतीची घोषणा शुक्रवारी अधिकृतरित्या करण्यात आली आहे. या युतीत इंडियन सेक्युलर पक्षाचाही समावेश करण्यात आला. या युतीचे पहिल्या दोन टप्प्यांमधील जागावाटपही घोषित करण्यात आले. त्यानुसार डावी आघाडी 40, काँगेस 12 आणि आयएसएफ 5 जागांवर लढणार आहे. डाव्या आघाडीने आपल्या सर्व उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. राज्यात 294 जागा असून मतदान 27 मार्च ते 29 एप्रिल अशा आठ टप्प्यांमध्ये होणार आहे. तिरंगी लढत होणार असली तरी मुख्य स्पर्धा भाजप आणि तृणमूल काँगेस यांच्यातच होईल असे अनुमान आहे.