ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसामच्या करीमगंज येथील पाथरकांडीचे भाजप उमेदवार कृष्णांदू पाल यांच्या बोलेरो गाडीत EVM मशीन सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेत आज चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देत करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
आसाम विधानसभेच्या 39 जागांसाठी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या खासगी गाडीत EVM मशीन सापडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा एक वास्तविक अहवाल सादर केला. त्या अहवालात म्हटले आहे की, राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक 149 वर गुरुवारी रात्री 9.20 वाजता निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहन मालकासंदर्भात कोणतीही चौकशी न करता EVM मशीन आणि इतर साहित्यांसह भाजप उमेदवाराच्या गाडीतून प्रवास केला. EVM मशीन सुरक्षित आहे. मात्र, या मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.