मँचेस्टर : ग्लेन मॅक्सवेल आणि ऍलेक्स कॅरी यांनी झळकवलेल्या शानदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडवर दोन चेंडू बाकी ठेवत तीन गडय़ांनी रोमांचक विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2-1 असा मालिकाविजय मिळविला. मॅक्सवेल सामनावीर व मालिकावीरचा मानकरी ठरला.
2 बाद 0 अशा खराब सुरुवातीनंतर इंग्लंडने बेअरस्टोचे शतक (126 चेंडूत 112) आणि सॅम बिलिंग्स (57) व ख्रिस वोक्स (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांमुळे 50 षटकांत 7 बाद 302 धावा जमविल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना 17 व्या षटकात ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 73 अशी केविलवाणी झाली होती. पण मॅक्सवेल (108) मैदानात उतरल्यावर त्याने कॅरीसमवेत सहाव्या गडय़ासाठी विक्रमी 212 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. मॅक्सवेलचे हे 113 सामन्यातील दुसरे शतक असून त्याने 90 चेंडूत 4 चौकार, 7 षटकार ठोकले. 114 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 106 धावा करणाऱया कॅरीचे हे 39 सामन्यांतील पहिलेच शतक आहे. 9 धावांवर असताना आर्चरने त्याला बाद केले होते. पण तो नोबॉल असल्याने कॅरी बचावला होता. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला 15 चेंडूत 18 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना कॅरीही बाद झाला. स्टार्कने पहिल्याच चेंडूवर रशिदला षटकार मारला आणि एक चौकार मारत दोन चेंडू बाकी ठेवून विजय साकार केला. इंग्लंडतर्फे वोक्स, रूट यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. इंग्लंडच्या डावात कर्णधार मॉर्गनने 23, टॉम करनने 19, आदिल रशिदने नाबाद 11 धावा केल्या तर ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क व झाम्पा यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. बेअरस्टोने 83 सामन्यात दहावे शतक नोंदवले.
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये झालेल्या गेल्या 18 सामन्यात इंग्लंडने गमविलेली ही पहिलीच मालिका आहे. 2015 नंतर इंग्लंडने मायदेशात गमविलेली तर जानेवारी 2017 नंतर गमविलेली ही पहिलीच वनडे मालिका आहे. 2007 नंतर पहिल्यांदाच सहाव्या व सातव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी एकाच डावात शतके नोंदवली. निम्मा संघ 100 धावांच्या आत बाद झाल्यानंतरही इंग्लंडविरुद्ध 300 धावांचा यशस्वी पाठलाग करणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ बनला आहे.