प्रतिनिधी/ वडूज
मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केलेच्या गुह्यात आ. जयकुमार गोरे, महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतली. यासंदर्भात गुरुवारी दोन तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशानी एक दिवस निर्णय राखीव ठेवला होता. त्यानंतर आज शुक्रवारी न्यायमूर्तींनी आ. जयकुमार गोरे यांच्यासह सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. यापूर्वी या गुन्हय़ामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची वडूज येथील सत्रन्यायालयाऐवजी अन्यत्र सुनावणी व्हावी यासाठी जिल्हा न्यायालयात आ. गोरे यांनी धाव घेतली होती. हा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे वडूज न्यायालयातच गुरुवारी अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकासाठी शुक्रवार दि. 6 मे रोजी तारीख दिली होती. याबाबत फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील मिलिंद ओक यांनी तर आ. गोरे यांच्यावतीने ऍड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. आता हा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आ. जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या असून ते उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.