प्रतिनिधी / सातारा :
स्थानबद्द केलेल्या ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आमदार महेश शिंदे यांनी दाखवलेल्या पाठींब्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ज्ञानोबा, तुकाराम, माऊलींचा गजर करत टाळ, चिपळ्यांच्या जयघोषात हे आंदोलन सुरु होते. आंदोलनावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देऊन बंडातात्यांना मुक्त करा, अशी मागणी करण्यात आली.
व्यसनमुक्त युवक महासंघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घेतलेल्या पवित्र्यामुळे त्यांना कराड येथील मठात स्थानबद्द केले आहे. त्यांना पोलिसांनी मुक्त करावे, त्यांची सुटका करावी या मागणीसाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये आमदार महेश शिंदे यांनी पाठींबा दिला होता. हाती टाळ घेत ज्ञानोबा तुकारामचा गरज गेला.
यावेळी शिंदे म्हणाले, वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे की, बंडातात्यांना स्थानबद्धतेतून मुक्त करुन त्यांना पंढरपूरला जाण्याची अनुमती दिली गेली पाहिजे. शासनाशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण जर असे झाले नाही तर वारकऱ्यांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होईल. महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. निवडणूका होत आहेत, असे असताना अद्यात्मिक शक्तींना आपण थांबवू शकत नाही. वारकरी सुद्धा कोरोनाचे सगळे नियम पाळून वारीला जावू शकतात. शासनाने चांगला नियम केला पाहिजे. या नियमानुसार वारी झाली पाहिजे, असे आमचे शासनाला आवाहन आहे.
बंडातात्यांची स्थानबद्दतेतून मुक्तता करावी, तात्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री तात्यांना मानतात. मी आज संध्याकाळी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. जिल्हा प्रशासनाची ही कारवाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन द्यायला आलो, असेही शिंदे म्हणाले.