प्रतिनिधी/ सातारा
कोंडवे ता. सातारा येथील गाडे वाडय़ाला आग लागून मोठी वित्त हानी झाली. या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने चार कुटुंबे अक्षरशः उघडय़ावर आली. या चार कुटुंबाच्या मदतीला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले धावून आले असून त्यांनी या चारही कुटुंबाना तातडीची मदत म्हणून स्वखर्चातून अन्नधान्य, घरावर टाकण्यासाठी स्टील आणि पत्रे अशी मदत जाहीर केली.
गाडे वाडय़ाला आग लागून रविंद्र म्हाकू गाडे, विजय म्हाकू गाडे, दत्तात्रय विठ्ठल गाडे आणि नितीन विठ्ठल गाडे यांची चार घरे उध्वस्थ झाली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, सरपंच किरण गाडे, उपसरपंच सौ. सुलभा भुजबळ, मधुकर निबांळकर, दिलीप निंबाळकर, मोहित सुर्वे, महेश गाडे आदी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जळीतग्रस्तांना धीर देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांना तातडीची मदत म्हणून स्वखर्चातून चारही कुटुंबाना 1 महिना पुरेल एवढे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्याचे जाहीर केले. याशिवाय घरावरील पत्रे, लाकडी तुळया जळाल्याने या चारही घरांसाठी पत्रे आणि स्टील स्वखर्चातून देत असल्याचे सांगितले. यामुळे या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला.