घटना पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील आहे. येथील एका रेस्टॉरंटच्या मालकिणीला तिच्या रेस्टेंटवर इंग्रजीतून व्हिडीओ बनविण्याची लहर आली. तिने हे कंत्रात दोन महिलांना दिले. या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला बोलाविण्यात आले. त्याने या रेस्टॉरंटची माहिती इंग्रजीतून सांगायची आणि त्याचा व्हिडीओ बनवायचा अशी ही योजना होती. व्हिडीओ बनविण्याचे काम सुरू झाले. तथापि, व्यवस्थापकाचे इंग्रजी कच्चे होते. त्यामुळे तो संवाद म्हणताना अडखळू लागला. त्याला आपले नावही इंग्रजीत व्यवस्थित सांगता येईना. त्यामुळे मालकीण आणि व्हिडीओ बनविणाऱया महिला भडकल्या. या महिनांनी त्याच्या इंग्रजीची खिल्ली उडवून त्याला चारचौघांसमक्ष अपमानित केले. व्यवस्थापक म्हणून बोलून चालून नोकर. मालकीणीसमोर काय बोलणार ? त्याने मुकाटय़ाने अपमान सहन केला.
पण, हा सर्व प्रकार पाहणाऱया लोकांना मात्र व्यवस्थापकाची ही अप्रतिष्ठा सहन झाली नाही. त्यांना रेस्टॉरंटच्या मालकिणीचा राग आला. अनेक लोकांनी ट्विटरवर या मालकिणीचा निषेध केला. तिच्या रेस्टॉरंटवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसादही चांगला मिळाला आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय धोक्यात आला. मालकिणीला मग पश्चात्ताप होऊ लागला. तिने लोकांची क्षमायाचना करून प्रकरण कसेबसे मिटवून टाकले.