भाभासुमंच्या कार्यकर्ता-मेळाव्यात ठराव
प्रतिनिधी / पणजी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गोव्यात 1990 ते 2021 अशी 21 वर्षांची फक्त मातृभाषा माध्यमालाच सरकारी अनुदान देण्याची माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी सुरु केलेली परंपरा मोडून, परक्मया इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना गोवा भाजपाने सुरू केलेले सरकारी अनुदान ताबडतोब बंद करावे, असा ठराव ओंकारध्वनीच्या नादात दोन्ही हात उंचावून, आज येथे भाभासुमंच्या कार्यकर्ता-मेळाव्यात पारित करण्यात आला.
येथील गोमंतक मराठा समाजाच्या भरगच्च भरलेल्या सभागृहात, भाभासुमं , भाजपा सरकारविरुद्ध गेली 10 वर्षे, मातृभाषा-रक्षणासाठी करत असलेल्या आंदोलनाचा नवीन टप्पा आज घोषित करण्यात आला.
व्यासपीठावर, राज्य निमंत्रक प्रा.सुभाष वेलिंगकर, गोवा बोर्डाचे माजी अध्यक्ष व शिक्षणतज्ञ प्रा. पांडुरंग नाडकर्णी, भाभासुमं समन्वयक प्रा. प्रविण नेसवणकर, सह- समन्वयक प्रा. दत्ता पु. नाईक, शिरोडा, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय सदस्या ऍड. स्वाती उल्हास केरकर, गोवा सुरक्षा मंच अध्यक्ष, नितीन फळदेसाई व भारतमाता की जय संघाचे उत्तर गोवा संघचालक पुरुषोत्तम कामत उपस्थित होते.
सत्ता टिकवण्यासाठी लोकांची सतत दिशाभूल, फसवणूक व विश्वासघाताची हिडीस कार्यपद्धती अनुसरणार्या भाजपा सरकारचा उन्माद 2017 च्या निवडणुकीत 21 आमदारांवरून जनतेने 13 आमदारांवर आणला होता. इंग्रजी अनुदान रद्द न केल्यास , गोवा भाजपाला शून्यावर आणावे असा निकराचा लढा, येत्या विधानसभा निवडणुकीत,आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवीत, भा.भा.सुमं, गोव्यातील स्वाभिमानी मातृभाषा- प्रेमी जनतेला संघटित करून देईल, असा इशारा सर्वच वक्त्या?नी या मेळाव्यात बोलताना दिला.
मेळाव्यात सामूहिकपणे पुढिल ठराव संमत करण्यात आले ः 1- इंग्रजीचे अनुदान तात्काल रद्द करणे. 2- नवीन मराठी- कोकणी शाळांना 2012 च्या सवलती-घोषणेनुसार मुक्तहस्त परवाने द्यावेत. 3- मराठी-कोकणी शाळांसाठी 2012 मध्ये जाहीर केलेल्या सर्व सवलती प्रत्यक्षात आणाव्यात. 4- 2012 पासून नवीन सुरु झालेल्या 91 मराठी- कोकणी शाळांना, आतापर्यंत न दिलेले, प्रत्येकी 17 लाख रुपयांचे विशेष अनुदान त्वरित चुकते करावे. 5- या सरकारने तडकाफडकी बंद केलेल्या मराठी-कोकणी शाळांसाठीची,400 रु.प्रति विद्यार्थी प्रतिमास योजना त्वरित चालू करावी व पूर्वलक्ष्यी तत्वावर या योजनेची साचलेली थकबाकी,त्या त्या शाळांना चुकती करावी. 6- मातृभाषा माध्यमाच्या सरकारी शाळा जिवंत रहाव्यात म्हणून तात्काल प्रा.माधव कामत समितीच्या शिफारसींची, 10 वर्षे कचरापेटीत टाकलेली, अंमलबजावणी करावी.
आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 1 एप्रिल ते 10 एप्रिल या काळात 18 ही प्रभागात 2 तासांचा धरणा कार्यक्रम योजलेला आहे. तो यशस्वी करण्यासाठी 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत गावो गावी कोपरा बैठका घेण्यात येणार आहेत. प्रारंभी मेळाव्याचा प्रारंभ सभेला घोषणा-चेतना देऊन प्रा. दीपक आमोणकर यानी, तर सूत्रसंचालन प्रा.दत्ता पु.नाईक यांनी केले. मेळाव्यात विद्यार्थी प्रतिनिधी शशांक नाईक, निरंजन मांदेकर, मातृशक्तीप्रमुख शुभांगी गावडे, प्रा. पांडुरंग नाडकर्णी, ऍड. स्वाती केरकर, नितीन फळदेसाई यांनी भाषणे केली. प्रा.सुभाष वेलिंगकर यानी समारोपाचे मार्गदर्शन केले व आगामी आंदोलनाचा कार्यक्रम घोषित केला.