वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील शनिवारी झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने लंकेचा 89 धावांनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या डेव्हिड मलानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 6 बाद 180 धावा जमविल्या त्यानंतर इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 18.5 षटकांत 91 धावांत आटोपला.
इंग्लंडच्या डावामध्ये डेव्हिड मलानने 48 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 76, बेअरस्टोने 43 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. या सलामीच्या जोडीने 11.4 षटकांत 105 धावांची शतकी भागिदारी केली. लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 2 चौकारांसह 14, सॅम करनने 1 चौकारांसह 9, जॉर्डनने 2 चौकारांसह नाबाद 8, मोईन अलीने 1 चौकारांसह 7 धावाजमविल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे चमिराने 17 धावांत 4 तर बिनुरा फर्नांडो आणि उदाना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा डाव 18.5 षटकांत 91 धावांत आटोपला. लंकेच्या डावात बिनुरा फर्नांडोने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 20, ओशादा फर्नांडोने 27 चेंडूत 1 षटकारांसह 19, डिक्वेलाने 19 चेंडूत 1 चौकारांसह 11, कुसल मेंडीसने 1 षटकारांसह 6, शनाकाने 1 चौकारांसह 7 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 3 षटकार आणि चार चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे विलीने 27 धावांत 3, सॅम करनने 14 धावांत 2 तर वोक्स, जॉर्डन, लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत 6 बाद 180 (डेव्हिड मॅलान 76, बेअरस्टो 51, लिव्हिंगस्टोन 14, चमिरा 4-17, बी. फर्नांडो 1-26, उदाना 1-55), लंका 18.5 षटकांत सर्वबाद 91 (बी. फर्नांडो 20, ओ. फर्नांडो 19, डिक्वेला 11, विली 3-27, सॅम करन 2-14, वोक्स, जॉर्डन, लिव्हिंगस्टोन, मोईन अली प्रत्येकी 1 बळी).