तिसरी टी-20 लढत : मलान-बटलरची विक्रमी भागीदारी, फॅफ डु प्लेसिस-रासी डुसेनची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था / केपटाऊन
सामनावीर व मालिकावीर डेव्हिड मलानने नोंदवलेल्या नाबाद 99 धावा आणि जोस बटलरसमवेत त्याने नोंदवलेल्या अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने तिसऱया टी-20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 9 गडय़ांनी एकतर्फी पराभव करीत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर त्यांची खराब सुरुवात झाली, पण फॅफ डु प्लेसिस व व्हान डर डुसेन यांनी डाव सावरत अभेद्य शतकी भागीदारी नोंदवत संघाला 20 षटकांत 3 बाद 191 अशी आव्हानात्मक धावसंख्या नोंदवून दिली. पण फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड मलान व बटलर यांनी आक्रमक फटकेबाजी करून दक्षिण आफ्रिकेचे आव्हान 14 चेंडू बाकी असतानाच पार केले. मलानने विजय मिळवून दिला तरी त्याचे शतक मात्र एका धावेने हुकले. नाबाद 67 धावा जमविणाऱया बटलरसमवेत त्याने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 167 धावांची विक्रमी भागीदारी केली. केवळ 90 चेंडूत त्यांनी ही भागीदारी केली.
पहिल्या दोन टी-20 सामन्यात द.आफ्रिकेला इंग्लंडने सहज हरविले होते. या सामन्यातही त्यांनी संथ सुरुवात करताना 10 षटकांत 3 बाद 64 अशी मजल मारली होती. नंतर रासी व्हान डर डुसेन व डु प्लेसिस यांची जोडी जमली आणि त्यांनी अभेद्य 127 धावांची भागीदारी करीत संघाला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. मात्र इंग्लंडच्या आक्रमकतेपुढे ती पुरेशी ठरली नसल्याचे दिसून आले. डुसेनने 32 चेंडूत 5 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 74 धावा फटकावल्या. त्याची ही टी-20 मधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. अनुभवी डु प्लेसिसने 37 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 52 फटकावल्या. या जोडीने शेवटच्या पाच षटकांत तब्बल 84 धावा झोडपल्या.
धावांचा पाठलाग करताना जेसॉन रॉय चौथ्या षटकात 16 धावांवर बाद झाला. पण मलान व बटलर यांनी चौफेर टोलेबाजी करीत द.आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेतला. 11 व 12 या दोन षटकांतच त्यांनी 40 धावा लुटल्या. रविवारच्या सामन्यात मलानने 55 धावा करीत इंग्लंडला मालिका विजय मिळवून दिला होता. तोच जोम त्याने या सामन्यात पुढे चालू ठेवला आणि 26 चेंडूतच शतकी मजल मारली. चौकार ठोकत तो 98 धावांवर पोहोचला त्यावेळी दोन्ही संघांची बरोबरी झाली होती. शतकाच्या उंबरठय़ावर पोचल्याची जाणीव नसल्यामुळे त्याने नंतर दुसरी धाव मिळणे शक्य असूनही एकच धाव घेतली. त्यामुळे तो शतकापासून वंचित राहिला.
या दोन संघांत आता तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी याच ठिकाणी सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 20 षटकांत 3 बाद 191 : डी कॉक 17 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), बव्हुमा 32 (26 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), हेन्ड्रिक्स 13 (14 चेंडूत 2 चौकार), डु प्लेसिस नाबाद 52 (37 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), व्हान ड डुसेन नाबाद 74 (32 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), अवांतर 3. गोलंदाजी : जॉर्डन 1-42, स्टोक्स 2-26, आर्चर 0-4). इंग्लंड 17.4 षटकांत 1 बाद 192 : रॉय 16 (14 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), बटलर नाबाद 67 (46 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), मलान नाबाद 99 (47 चेंडूत 11 चौकार, 5 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी : नॉर्त्जे 1-37, सिपाम्ला 0-45, शम्सी 0-57).