तिसऱया कसोटी मालिकेत डाव व 53 धावांनी बाजी
पोर्ट एलिझाबेथ / वृत्तसंस्था
सेंट जॉर्ज पार्कवर तिसऱया कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 डाव व 53 धावांनी सहज विजय प्राप्त करत 4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. केशव महाराज (71) व डेन पॅटरसन (नाबाद 39) या जोडीने शेवटच्या गडय़ासाठी 99 धावांची झुंजार भागीदारी साकारत विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, ते आफ्रिकेच्या डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले. सॅम करणने मिडऑनवरुन यष्टीचा थेट वेध घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 237 धावांवर संपुष्टात आला आणि इथे इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
दक्षिण आफ्रिकेने शेवटचे 4 गडी गमावताना 135 धावांची भर घातली. मार्क वूड व डॉम बेस यांनी दक्षिण आफ्रिकेला काही धक्के दिले. मात्र, त्यापूर्वी कर्णधार जो रुटने घेतलेले 4 बळी डावाला अधिक सुरुंग लावणारे ठरले. रुटने 87 धावात 4 बळी, असे पृथक्करण नोंदवले. दक्षिण आफ्रिकन संघाची ही एकंदरीत हाराकिरी कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस व नवे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या दृष्टीने बरीच चिंतेची ठरली. या निकालाने प्लेसिसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असले तरी त्याने यानंतरही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्व भूषवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शुक्रवारपासून उभय संघात चौथी व शेवटची कसोटी जोहान्सबर्गमध्ये खेळवली जाणार असून या कसोटीच्या माध्यमातूनच प्लेसिसच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सांगता होण्याची शक्यता सध्या ठळक चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी मागील 8 कसोटी सामन्यातील हा चक्क सातवा पराभव आहे. या लढतीत दक्षिण आफ्रिकेला जलद गोलंदाज रबाडाची प्रकर्षाने उणीव जाणवली. इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 499 धावांवर घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन्ही डावात निराशा केली. पहिल्या डावात ऑफस्पिनर बेसने तर दुसऱया डावात रुटने त्यांच्या डावाला जोरदार सुरुंग लावत त्यांचे खराब तंत्र पुन्हा उघडकीस आणले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 9-499 घोषित.
द. आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद 209
द. आफ्रिका दुसरा डाव (फॉलोऑननंतर) : 88.5 षटकात सर्वबाद 237 (केशव महाराज 106 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 71, फॅफ डय़ू प्लेसिस 6 चौकार, 1 षटकारासह 36, डेव्ह पॅटरसन 40 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 39. जो रुट 29 षटकात 4-87, मार्क वूड 3-32, ब्रॉड व डॉम बेस प्रत्येकी 1 बळी).
ब्लर्ब
उभय संघातील चौथी कसोटी शुक्रवारपासून खेळवली जाईल.