वृत्तसंस्था / ऑकलंड
विद्यमान विजेत्या इंग्लंडने यजमान न्यूझीलंडवर एका गडय़ाने निसटता विजय मिळवित महिलांच्या विश्वचषक वनडे स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याच्या कायम राखल्या. अर्धशतकी खेळी करणाऱया इंग्लंडच्या स्किव्हरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
न्यूझीलंडसाठी मध्यफळीतील अनुभवी फलंदाज मॅडी ग्रीनने सर्वाधिक नाबाद 52 धावा जमविल्या तर कर्णधार सोफी डिव्हाईनने 41 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर इंग्लंडने न्यूझीलंडचा डाव 48.5 षटकांत 203 धावांत संपुष्टात आणला. इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉस (35 धावांत 3 बळी) व स्टार स्पिनर सोफी एक्लेस्टोन (41 धावांत 3 बळी) या दोघींनी मिळून सहा बळी मिळविले तर स्पिनर चार्ली डीनने 2 बळी मिळविले. त्यानंतर नताली स्किव्हरने संयमी अर्धशतक (61) नोंदवत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यांची स्थिती 5 बाद 176 अशी भक्कम होती. पण पाच षटकांतच त्यांची 9 बाद 196 अशी घसरगुंडी उडाल्यानंतर श्रबसोल (7) व चार्ली डीन (0) यांनी विजय मिळवून दिला.
त्यांनी पराभव जवळपास ओढवूनच घेतला होता. अनया श्रबसोल (7) व चार्ली डीन (0) यांनी संयमी खेळ करीत संघाला 47.2 षटकांत विजय मिळवून देण्यात यश मिळविले. इंग्लंडचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे.
या विजयामुळे न्यूझीलंडला पाचव्या स्थानावरून मागे टाकत उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारत, इंग्लंड व न्यूझीलंड या तिघांचेही प्रत्येकी 4 गुण झाले आहेत. भारत व इंग्लंडचे अद्याप दोन सामने बाकी असून न्यूझीलंडचा केवळ एकच सामना बाकी राहिला असल्याने त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. पण डॅनी वॅट 12 व टॅमी ब्युमाँट 25 धावा काढून बाद झाल्या. जेस्स केर व लीया ताहुहू यांनी हे बळी मिळविले. कर्णधार हीदर नाईटने 53 चेंडूत जलद 42 धावा काढल्या. पण 23 व्या षटकांत प्रँकी मॅकायने तिला पायचीत केले. ऍमी जोन्सही एक धाव काढून बाद झाल्यानंत स्किव्हरने सोफी डंकलीसमवेत 70 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या समीप आणून ठेवले. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करीत इंग्लंडचे झटपट बळी मिळवित त्यांच्यावर दडपण आणले हेते. पण अखेरच्या जोडीने संयम राखत संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, सुझी बेट्स व डिव्हाईन यांनी 61 धावांची भागीदारी केली तेव्हा न्यूझीलंड संघ मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे वाटत होते. डिव्हाईने सफाईदार फलंदाजी करीत होती आणि ऍमेलिया केरही (24) आश्वासक वाटत होती. मात्र डिव्हाईनवर निवृत्त होण्याची वेळ आली. दुसरी धाव घेण्यासाठी ती वळली तेव्हा तिच्या पाठीत चमक भरली आणि 15 व्या षटकावेळी निवृत्त झाली, त्यावेळी तिने 37 धावा जमविल्या होत्या. नंतर ती पुन्हा फलंदाजीस आली, पण ती 41 धावा काढून बाद झाली. नंतर ती क्षेत्ररक्षणासही आली नाही. सॅटर्थवेटने तिच्या जागी संघाचे नेतृत्व केले. केरला चार्लोट डीनने बाद केल्यानंतर अनुभवी ऍमी सॅटर्थवेट (24) व ग्रीन यांनी फाईटबॅकचा प्रयत्न केला. आधीच्या काही सामन्यांत गचाळ क्षेत्ररक्षण करणाऱया इंग्लंडने यावेळी मात्र छान कामगिरी केली आणि दोघींना धावचीत केले. सॅटर्थवेट पायचीत झाल्यानंतर क्रॉस व एक्लेस्टोनने न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळून 49 व्या षटकांत त्यांचा डाव संपुष्टात आणला. ग्रीनने नाबाद राहत 52 धावा जमविल्या. त्यात 4 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता तर डिव्हाईनने 48 चेंडूंच्या खेळीत 41 धावा जमविताना 5 चौकार मारले.