ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली ऍशेस कसोटी : पॅट कमिन्सचे 38 धावात 5 बळी, बेन स्टोक्स पुनरागमनात स्वस्तात बाद, रुट-मलानचीही निराशा
वृत्तसंस्था /ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमधील पहिलावहिला जलद गोलंदाजी कर्णधार पॅट कमिन्सने अवघ्या 38 धावात निम्मा संघ गारद केल्यानंतर येथील पहिल्या ऍशेस कसोटी मालिकेत इंग्लंडचा पहिला डाव 147 धावांमध्येच खुर्दा झाला. इंग्लिश कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, डावातील पहिल्याच चेंडूवर स्टार्कने एका अप्रतिम स्विंगिंग यॉर्करवर सलामीवीर रोरी बर्न्सला त्रिफळाचीत केले आणि इथून इंग्लंडच्या पडझडीला सुरुवात झाली.
स्टार्कने प्रारंभी मोठा धक्का दिल्यानंतर जोश हॅझलवूडने डेव्हिड मलान (6) व जो रुट (0) यांना स्वस्तात बाद केले आणि यामुळे इंग्लंडची 6 षटकात 3 बाद 11 अशी दाणादाण उडाली. कमिन्सने स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला (5) तिसऱया स्लीपमधील मार्नस लाबुशानेकरवी झेलबाद करत या डावातील आपला पहिला बळी नोंदवला. ड्रिंक्स ब्रेकमध्ये इंग्लंडची 4 बाद 29 अशी दारुण अवस्था होती.
एका बाजूने सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना सलामीवीर हसीब हमीदने ऑस्ट्रेलियन मारा थोपवण्याचा प्रयत्न करत संघाला उपाहाराअखेर 4 बाद 59 धावांपर्यंत नेले. मात्र, नंतर तो ही कमिन्सच्या बाहेर जाणाऱया चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. दुसऱया स्लीपमधील स्टीव्ह स्मिथने यावेळी सोपा झेल टिपला.
पोप-बटलरची अर्धशतकी भागीदारी
ऑलि पोप व जोस बटलर यांनी अर्धशतकी भागीदारी साकारत ही पडझड थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बटलरने चौकार फटकावत 39 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, पुढील चेंडूवरच तो स्टार्कच्या गोलंदाजीवर यष्टीमागे ऍलेक्स कॅरेकडे झेल देत बाद झाला आणि इंग्लंडची 6 बाद 112 अशी स्थिती झाली.
ऑलि पोप (35) हूक मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होण्यापूर्वी इंग्लंडने आणखी 6 धावांची भर घातली. फाईन लेगनजीक हॅझलवूडने डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. यामुळे अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला पहिला कसोटी बळी घेता आला. कमिन्सने ऑलि रॉबिन्सनला (0) यष्टीमागे तर मार्क वूडला (8) शॉर्ट लेगकरवी झेलबाद केले. ख्रिस वोक्स (21) इंग्लंडच्या डावात बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. त्याने कमिन्सच्या गोलंदाजीवरच डीपमधील हॅझलवूडकडे झेल दिला.
कमिन्सने 13.1 षटकात 38 धावात 5 बळी असे भेदक पृथक्करण नोंदवले तर स्टार्क व हॅझलवूड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पदार्पणवीर कॅमेरुन ग्रीनने 3 षटकात 6 धावात कसोटी कारकिर्दीतील आपला पहिलावहिला बळी नोंदवला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : रोरी बर्न्स त्रि. गो. स्टार्क 0 (1 चेंडू), हसीब हमीद झे. स्मिथ, गो. कमिन्स 25 (75 चेंडूत 3 चौकार), डेव्हिड मलान झे. कॅरे, गो. हॅझलवूड 6 (9 चेंडूत 1 चौकार), जो रुट झे. वॉर्नर, गो. हॅझलवूड 0 (9 चेंडू), बेन स्टोक्स झे. लाबुशाने, गो. कमिन्स 5 (21 चेंडूत 1 चौकार), ऑलि पोप झे. हॅझलवूड, गो. ग्रीन 35 (79 चेंडूत 2 चौकार), जोस बटलर झे. कॅरे, गो. स्टार्क 39 (58 चेंडूत 5 चौकार), ख्रिस वोक्स झे. हॅझलवूड, गो. कमिन्स 21 (24 चेंडूत 4 चौकार), ऑलि रॉबिन्सन झे. कॅरे, गो. कमिन्स 0 (3 चेंडू), मार्क वूड झे. हॅरिस, गो. कमिन्स 8 (15 चेंडूत 1 चौकार), जॅक लिच नाबाद 2 (7 चेंडू). अवांतर 6. एकूण 50.1 षटकात सर्वबाद 147.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (बर्न्स, 0.1), 2-11 (मलान, 3.2), 3-11 (रुट, 5.5), 4-29 (स्टोक्स, 12.4), 5-60 (हमीद, 26.4), 6-112 (बटलर, 40.3), 7-118 (ऑलि पोप, 43.1), 8-122 (रॉबिन्सन, 44.3), 9-144 (वूड, 48.3), 10-147 (वोक्स, 50.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 12-2-35-2, हॅझलवूड 13-4-42-2, कमिन्स 13.1-3-38-5, लियॉन 9-2-21-0, कॅमेरुन ग्रीन 3-1-6-1.
ऍशेसमध्ये 1936 नंतर प्रथमच पहिल्या चेंडूवर इंग्लंडला धक्का!
ऍशेस मालिकेत पाहुण्या संघाचा एखादा फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची ही 1936 नंतरची पहिलीच वेळ ठरली. 1936 मध्ये ऑस्ट्रेलियात ऍशेस खेळत असताना इंग्लंडला पहिल्या चेंडूवरच सलामीवीर गमवावा लागला, पुढे त्यांची 3 बाद 20 अशी पडझड झाली. मात्र, यानंतरही इंग्लंडने तो सामना जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. यंदा इंग्लंडसाठी बरीच प्रतिकूल स्थिती असून त्यांनी 2010-11 ऍशेस मालिकाविजयानंतर ऑस्ट्रेलियात एकही कसोटी जिंकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जेव्हा नाणेफेक गमावणे पॅट कमिन्सच्या पथ्यावर पडले!
टीम पेनच्या गैरहजेरीत नेतृत्वाची धुरा भूषवत असलेल्या पॅट कमिन्सला नाणेफेकीचा कौल जिंकता आला नाही. पण, नाणेफेक जिंकणाऱया रुटसमोर कठीण निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्याच्यावर बुमरँग झाला. गब्बावरील हिरवळीच्या विकेटवर इंग्लंडचा डाव पाहता पाहता गडगडला आणि यामुळे नाणेफेक गमावणे देखील कमिन्सच्या पथ्यावरच पडल्याचे स्पष्ट झाले.
जेम्स अँडरसननंतर स्टुअर्ट ब्रॉडही पहिल्या लढतीतून बाहेर
या लढतीत इंग्लिश गोलंदाजीत अनुभवाची कमतरता असेल, हे बुधवारी नाणेफेकीवेळी स्पष्ट झाले. इंग्लंडचा अनुभवी जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड येथे खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले गेले. जेम्स अँडरसन खेळणार नसल्याने इंग्लिश गोलंदाजी लाईनअपला तो पहिला धक्का होता. त्यात आता ब्रॉडची भर पडली आहे. ब्रॉड व अँडरसन यांनी 9 वेळा ऑस्ट्रेलियाचा ऍशेस दौरा केला आहे. यंदा मात्र इंग्लिश संघाला त्यांची प्रकर्षाने उणीव जाणवू शकते. त्यांच्या गैरहजेरीत मार्क वूड, वोक्स व रॉबिन्सन हे स्पेशालिस्ट जलद गोलंदाज व जॅक लिच हा स्पेशालिस्ट फिरकीपटूवर त्यांची भिस्त असेल.