कमिन्स-लियॉनला तिहेरी यश, स्टार्कचे 2 बळी, पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 1 बाद 61
मेलबर्न / वृत्तसंस्था
यंदाच्या ऍशेस मालिकेत सातत्याने झगडत असलेल्या इंग्लिश संघाची खराब कामगिरीची मालिका तिसऱया कसोटीतील पहिल्या डावातही कायम राहिली. रविवारी या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांचा डाव अवघ्या 185 धावांमध्ये खुर्दा झाला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 अशी सावध सुरुवात नोंदवत सामन्यावर उत्तम वर्चस्व प्रस्थापित केले. मार्कस हॅरिस 20 तर नाईट वॉचमन नॅथन लियॉन शून्यावर खेळत होते.
यापूर्वी, ऍडलेड कसोटीत 275 धावांनी नामुष्कीजनक पराभव पत्करणाऱया इंग्लंडचा बॅड पॅच येथे नाणेफेकीपासूनच कायम राहिला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकल्यानंतर सीम गोलंदाजीला पोषक एमसीजीच्या खेळपट्टीवर इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले.
प्रारंभापासूनच पडझड अनुभवणाऱया इंग्लंडची उपाहारापर्यंत 3 बाद 61 आणि चहापानापर्यंत 6 बाद 128 अशी पडझड झाली. कर्णधार जो रुटने 50 धावा जमवल्या असल्या तरी तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने इंग्लंडला आणखी एक धक्का पचवावा लागला. जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित पॅट कमिन्स (3-36), फिरकीपटू नॅथन लियॉन (3-36), डावखुरा मिशेल स्टार्क (2-54) यांनी इंग्लिश फलंदाजांवर सातत्याने दडपण राखले. आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडूवर रुटचा खराब फटका त्याची खेळी संपुष्टात आणणारा ठरला. बेन स्टोक्स व जोस बटलरही खराब फटक्यावरच आपली विकेट बहाल करत परतले.
कमिन्सने इंग्लंडच्या आघाडी फळीला खिंडार पाडले. त्याने पहिल्याच सत्रात 3 बळी घेतले. डेव्हिड मलानने रुटसमवेत तिसऱया गडय़ासाठी 48 धावा जोडल्या. मात्र, कमिन्सने उपाहारापूर्वी शेवटच्या षटकात मलानला पहिल्या स्लीपकरवी बाद केले. ऑस्ट्रेलियाने दुसऱया सत्रातही 3 बळी घेतले. या सत्रात त्यांनी रुट व स्टोक्स या धोकादायक फलंदाजांची खेळी संपुष्टात आणली. चहापानापूर्वी शेवटच्या षटकात बटलरने लियॉनच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवर झेल दिला.
जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित रुटने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर यष्टीमागे ऍलेक्स कॅरेकडे सोपा झेल दिला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 1788 धावांचा मोहम्मद युसूफचा विक्रम मोडण्यासाठी रुटला दुसऱया डावात 109 धावांची आवश्यकता असणार आहे. पदार्पणवीर स्कॉट बोलँडने मार्क वूडला बाद करत आपला पहिला बळी नोंदवला. जॉनी बेअरस्टोने स्टार्कच्या गोलंदाजीवर गलीकरवी झेलबाद होण्यापूर्वी 35 धावा जमवल्या. तो बाद झाला, त्यावेळी इंग्लंडची 8 बाद 159 अशी स्थिती होती. नंतर लियॉनने जॅक लीच (13) व ऑलि रॉबिन्सन (22) यांना बाद करत इंग्लंडचा डाव 65.1 षटकात सर्वबाद 185 धावांवर गुंडाळला.
ऑस्ट्रेलियन डावात डेव्हिड वॉर्नर (38) व मार्कस हॅरिस (नाबाद 20) यांनी 57 धावांची सलामी दिली. वॉर्नरने अँडरसनच्या गोलंदाजीवर गलीवर तैनात क्रॉलीकडे सोपा झेल दिला. नाईटवॉचमन नॅथन लियॉन 5 चेंडूत शून्यावर नाबाद राहिला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः हसीब हमीद झे. कॅरे, गो. कमिन्स 0 (10 चेंडू), झॅक क्रॉली झे. ग्रीन, गो. कमिन्स 12 (25 चेंडू), डेव्हिड मलान झे. वॉर्नर, गो. कमिन्स 14 (66 चेंडूत 1 चौकार), जो रुट झे. कॅरे, गो. स्टार्क 50 (82 चेंडूत 4 चौकार), बेन स्टोक्स झे. लियॉन, गो. ग्रीन 25 (60 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. ग्रीन, गो. स्टार्क 35 (75 चेंडूत 3 चौकार), जोस बटलर झे. बोलँड, गो. लियॉन 3 (11 चेंडू), मार्क वूड पायचीत गो. बोलँड 6 (15 चेंडू), ऑलि रॉबिन्सन झे. बोलँड, गो. लियॉन 22 (26 चेंडूत 3 चौकार), जॅक लीच झे. स्मिथ, गो. लियॉन 13 (18 चेंडूत 1 षटकार), जेम्स अँडरसन नाबाद 0 (4 चेंडू). अवांतर 5. एकूण 65.1 षटकात सर्वबाद 185.
गडी बाद होण्याचा क्रम
1-4 (हसीब, 1.5), 2-13 (क्रॉली, 7.2), 3-61 (मलान, 26.3), 4-82 (रुट, 32.6), 5-115 (स्टोक्स, 46.2), 6-128 (बटलर, 51.2), 7-141 (वूड, 55.5), 8-159 (बेअरस्टो, 58.4), 9-176 (लीच, 63.3), 10-185 (रॉबिन्सन, 65.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 15-3-54-2, पॅट कमिन्स 15-2-36-3, स्कॉट बोलँड 13-2-48-1, कॅमेरुन ग्रीन 8-4-7-1, नॅथन लियॉन 14.1-3-36-3.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः मार्कस हॅरिस खेळत आहे 20 (51 चेंडूत 3 चौकार), डेव्हिड वॉर्नर झे. क्रॉली, गो. अँडरसन 38 (42 चेंडूत 5 चौकार), नॅथन लियॉन खेळत आहे 0 (5 चेंडू). अवांतर 3. एकूण 16 षटकात 1 बाद 61.
गडी बाद होण्याचा क्रम
1-57 (वॉर्नर, 14.1).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 5-1-14-1, ऑलि रॉबिन्सन 5-0-23-0, मार्क वूड 4-0-15-0, बेन स्टोक्स 2-0-8-0.